नागपूर : मेहुण्याने मारहाण केल्याने जखमी झालेल्या जावयाचा मेयो हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन मेहुण्याला अटक केली. अंकुश अरुण बन्सोड (वय २७, रा. कबिरनगर),असे अटकेतील मेहुण्याचे तर सूरज खोब्रागडे,असे मृत जावायाचे नाव आहे.
रविवारी सूरज याच्या नातेवाइकाचा लग्नसमारंभ होता. यासाठी सूरज हा पत्नी अश्विनीला घेऊन जाणार होता. मात्र यादरम्यान दोघांचा वाद झाला. सूरज याने अश्विनीला शिविगाळ करून मारहाण केली. यात सूरजही जखमी झाला. अश्विनीने अंकुश याला घटनेची माहिती दिली.
अंकुश तेथे आला.त्याने सूरज याला समजविण्याचा प्रयत्न केला. अंकुश हा सूरजला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होता. याचदरम्यान सूरज याने अंकुश यालाही शिविगाळ केली. त्यामुळे अंकुश संतापला. त्याने दगडाने सूरज याचे डोक्यावर वार केले. सूरज बेशुद्ध झाला. अंकुश याने सूरज याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याने अश्विनीला याबाबत सांगितले.
अश्विनीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आधी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. अंकुश याला अटक केली.उपचारादरम्यान सूरज याचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी अंकुश याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
अधिक वाचा : रिश्वत प्रकरण में घिरे वाड़ी नगराध्यक्ष झाड़े को कोर्ट से मिली जमानत