नागपूर : यावर्षी रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, पोळा, हरितालिका, गणेशोत्सव, गौरीपूजन हे सण ऑगस्ट महिन्यात येत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून खरेदीला उधाण येणार आहे. चार महिन्यांच्या मंदीनंतर ऑगस्ट महिन्यात चांगल्या व्यवसायाची व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. एकीकडे कोरोना संसर्गाची भीती आणि दुसरीकडे व्यवसायाची संधी, यावर मात करीत यंदाच्या ऑगस्टमध्ये येणारे सण ‘कॅश’ करण्याची तयारी व्यापाऱ्यांनी चालविली आहे.
जीवनाला अध्यात्म, भक्तिभावाचा स्पर्श देण्यासाठी सर्वच सण-उत्सवांना देवकल्पना, पौराणिक कथा-कल्पनांची जोड दिली आहे. विशिष्ट देवतेचे अधिष्ठान, श्रद्धा, भक्तिभाव, पूजा, व्रत, नैवेद्य इत्यादींची जोड दिल्यामुळे सण धार्मिक भावनेने, श्रद्धेने साजरे केले जातात. या सणांची व्यापारी आतुरतेने वाट पाहत असतात. अनेक वर्षांनंतर हिंदू संस्कृतीत साजरे करण्यात येणारे सहा सण ऑगस्ट महिन्यातच आले आहेत. खाद्यान्नापासून ते नवीन वस्तू खरेदीचे मुहूर्त याच महिन्यात आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्र असो वा इलेक्ट्रॉनिक्स आणि सजावटीच्या वस्तूंच्या बाजारात उत्साहाचे वातावरण राहणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी नवीन उत्पादने आणि योजना आणल्या आहेत. याची तयारी शोरूम संचालकांनी आतापासूनच सुरू केल्याची माहिती व्यावसायिक व्यावसायिकांनी लोकमतशी बोलताना दिली.
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोने-चांदी, दुचाकी-चारचाकी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि नवीन घर खरेदीची परंपरा आहे. या निमित्ताने दुकानदारांनी तयारी चालविली आहे. ग्राहकांना खरेदीसाठी फायनान्स कंपन्यांच्या शून्य टक्के योजना आहेत. याशिवाय सणांची खाद्यसंस्कृती आजही भारतीय समाजात चांगलीच मूळ धरून आहे. रक्षाबंधनानिमित्त नामांकित कंपन्यांनी बहिणींना भेट देण्यासाठी आकर्षक पॅकिंगमध्ये भेटवस्तू आणि चॉकलेट बाजारात आणले आहेत. गणेशोत्सवात सर्वच क्षेत्रातील व्यापाऱ्यांना व्यवसायाची संधी आहे. त्यात सजावटीच्या वस्तूंपासून खाद्यान्न कंपन्यांना सर्वाधिक व्यवसायाची अपेक्षा आहे.
३ ऑगस्ट रक्षाबंधन
१२ ऑगस्ट गोकुळाष्टमी
१८ ऑगस्ट पोळा
२१ ऑगस्ट हरितालिका
२२ ऑगस्ट श्री गणेश चतुर्थी (गणेश स्थापना)
२६ ऑगस्ट गौरीपूजन