मुंबई : पीक कर्जाची नियमित परतफेड करणार्या शेतकर्यांना आता तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के दराने व्याज आकारणी केली जाईल. एक लाख ते तीन लाख रुपयांच्या कर्ज मर्यादेत दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास सध्याच्या एक टक्का व्याज दरात आणखी दोन टक्के व्याज दर सवलत देण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्याची पूर्तता या निर्णयाने झाली आहे.
कृषी उत्पन्नवाढीसाठी शेतकर्यांना आधुनिक बियाणे, खते, औषधे खरेदी करता येणार आहेत. यातून शेती उत्पादनात वाढ होईल. तसेच व्याज सवलत मिळण्यासाठी शेतकरी पीक कर्जाची मुदतीत परतफेड करतील. त्यामुळे बँकांची वसुली वाढून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये दिलेल्या मुदतीत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांना प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते. योजनेत दिलेल्या मुदतीत अल्पमुदत पीक कर्ज परतफेड करणार्या शेतकर्यांना 1 लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत 3 टक्के व्याज सवलत, 1 लाख ते 3 लाख रुपये या कर्ज मर्यादेपर्यंत 1 टक्का व्याज दरात सवलत देण्यात येत होती, आता 1 लाख ते 3 लाख रुपये या कर्ज मर्यादेमध्ये शेतकर्यांनी अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीमध्ये केल्यास त्यांना अधिक 2 टक्के व्याज दरात सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
केंद्र, राज्य सरकार प्रत्येकी 3% सवलत देणार
दिलेल्या मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांना 3 लाख रुपये मर्यादेपर्यंतच्या कर्जावर सरसकट 3 टक्के व्याजाची सवलत राज्य शासनामार्फत मिळेल व केंद्र शासनामार्फतही 3 लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत पीक कर्जाची परतफेड मुदतीत केल्यास 3 टक्के व्याज सवलत मिळते. त्यामुळे आता सन 2021-22 पासून शेतकर्यांना 3 लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत अल्पमुदतीच्या कर्जाची परतफेड दिलेल्या मुदतीमध्ये केल्यास त्यांना एकूण 6 टक्के व्याज सवलत मिळून सदरचे पीक कर्ज शून्य टक्के दराने उपलब्ध होईल.