चालत्या ट्रेनमध्ये प्रेयसीची गळा चिरून हत्या, 5 दिवसानंतर आरोपीनं जेलमध्ये घेतला गळफास

crime, Murder in Nagpur नागपूर

भोपाळ: एका युवकानं आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या (Murder of Girlfriend) केल्याची बातमी समोर आली होती. आता आरोपी प्रियकरानं स्वतःही तुरुंगात गळफास घेत आत्महत्या (Criminal Killed Himself in Prison) केली आहे. आरोपीनं चालत्या ट्रेनमध्ये आपल्या प्रेयसीची हत्या केली होती. यानंतर भोपाळमध्ये जीआरपीनं या आरोपीला अटक केली होती. तेव्हापासून तो सीहोर जेलमध्ये होता. मात्र, आता आपल्या प्रेयसीची हत्या केल्यानंतर पाचव्या दिवशी या युवकानं स्वतःही आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 1 जूनच्या रात्री इंदौर-बिलासपुर नर्मदा एक्सप्रेस ट्रेनमध्ये भोपाळचा रहिवासी असलेल्या सागर सोनी यानं आपल्या 21 वर्षीय प्रेयसी मुस्कान हाडा हिची गळा चिरुन हत्या केली. यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला. यानंतर संपूर्ण ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली. यानंर ट्रेन सीहोर स्टेशनवर थांबवण्यात आली. इथून ही ट्रेन दोन तासांनी सोडण्यात आली. पोलिसांनी तरुणीचा मृतदेहही शवविच्छेदनासाठी सीहोरमध्ये उतरवला. पोलीस आणि जीआरपी या प्रकरणाचा तपास करत होते. याच दरम्यान पोलिसांनी आरोपी सागर सोनी याला भोपाळमधून अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर ट्रेनमध्ये वृत्तपत्र आणि चहा विकण्याचं काम करायचा. सागर आणि मुस्कान यांची मैत्रीही होती. आरोपी सागरनं पोलिसांनी चौकशीत असं सांगितलं, की त्याचं मुस्कानवर प्रेम होतं. मात्र, मुस्काननं त्याच्या मोबाईल नंबर ब्लॉक केला होता. यामुळे त्याला मुस्कानसोबत बोलता येत नव्हतं. याच कारणामुळे त्यानं 1 जून रोजी चालत्या ट्रेनमध्ये मुस्कानची हत्या केली.

पोलिसांनी सांगितलं, की सोमवारी याबाबतची माहिती मिळाली, की सीहोर तुरुंगात बंद असलेल्या भोपाळचा निवासी सागर सोनी यानं टी शर्टच्या सहाय्यानं गळफास घेत आत्महत्या केली. जेल कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. जेल अधीक्षक संजय सेहलाम यांनी सांगितलं, की त्याला दोन दिवस आधी कैद करण्यात आलं होतं. कोविड प्रोटोकॉलमुळे त्याला विभक्त ठेवण्यात आलं होतं. याबाबची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं कारणही स्पष्ट होईल.