Covid19 ; नागपुरात ‘ऑक्सिजन बेड’ असलेले रेल्वेचे २९ ‘कोच’ वापराविना पडले आहे.

Covid19

Covid19  नागपूर : ‘कोरोना’च्या दुसऱ्या लाटेमध्ये ‘ऑक्सिजन’ची सुविधा असलेल्या ‘बेड्स’साठी रुग्णांना अक्षरश: हातात जीव घेऊन वणवण भटकावे लागत आहे. अशास्थितीत नागपूर महानगरपालिकेचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. रेल्वेने २९ ‘कोच’मध्ये ‘ऑक्सिजन बेड’ची व्यवस्था केली होती. मात्र हे ‘कोच’ वापराविना पडले असून, नागपूर महानगरपालिकेतर्फे रेल्वेला संपर्क करण्यात आला नाही. यासंदर्भात तातडीने मनपाने रेल्वेशी समन्वय साधावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. मात्र न्यायालयाच्या निर्देशांचे तर मनपा प्रशासन वेळेत पालन करणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

उपराजधानीसह संपूर्ण महाराष्ट्रात ‘कोरोना’चा वेगाने संसर्ग होत आहे. ‘कोरोना’ची सध्याची स्थिती पाहता २९ रेल्वे कोचला ‘क्वारंटाइन’ केंद्रामध्ये परावर्तित करण्यात आले आहे. तेथे ‘ऑक्सिजन बेड’देखील आहेत. राज्य शासन व महानगरपालिकेच्या विनंतीवर ‘क्वारंटाइन’ केंद्र सामान्य जनतेला उपलब्ध करून दिले जाऊ शकतात, असे मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे यांनी ९ एप्रिल रोजीच स्पष्ट केले होते. मात्र मनपाकडून रेल्वेकडे पाठपुरावाच करण्यात आला नाही.

Covid19  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून दाखल करून घेतलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान मनपाचा फोलपणा उघड पडला. अजनी रेल्वे यार्डात २९ कोच उभे आहेत. ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी ते पूर्णत: सज्ज आहेत, अशी रेल्वेच्या अधिवक्त्यांकडून माहिती देण्यात आली. याचाच अर्थ दहा दिवसांत मनपाने रेल्वेकडे यासंदर्भात ठोस पाठपुरावा केलाच नाही. अन्यथा हे ‘कोच’ रिकामे यार्डात उभे राहण्याची वेळच आली नसती.

आज अहवाल द्यावा लागणार

या ‘कोच’चा योग्य उपयोग व्हावा यासाठी मनपा आयुक्तांनी रेल्वे प्रशासनाशी तात्काळ समन्वय साधण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. २१ एप्रिल रोजी यासंदर्भातील अहवाल सादर करण्याच्यादेखील सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी मनपाचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.