नागपूर : शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मनपाद्वारे ‘हाय रिक्स’ व्यक्तींची ‘कोव्हिड स्वॅब टेस्ट’ करण्यात येत आहे. सोमवारी (ता.२८) हनुमाननगर झोन अंतर्गत १४८ जणांची ‘स्वॅब टेस्ट’ करण्यात आली.
हनुमाननगर येथील चौकोनी मैदानात मनपाच्या वैद्यकीय चमूद्वारे परिसरातील नागरिकांनी चाचणी करण्यात आली. याप्रसंगी स्थानिक नगरसेवक रवींद्र (छोटू) भोयर, नगरसेविका उषा पॅलेट, शीतल कामडी, मनपाचे अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार, डॉ. गोगुलवार, डॉ.शुभम मनगटे, डॉ. सागर नायडू उपस्थित होते.
हनुमाननगर परिसरात कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता येथील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आहेत अशा ‘हाय रिस्क’मधील नागरिकांसह कोणतिही लक्षणे नसलेली व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचीही कोव्हिड स्वॅब टेस्ट करण्यात आली. कोव्हिड संदर्भातील सर्व दिशानिर्देशांचे पालन करून संपूर्ण सुरक्षितरित्या ही चाचणी घेण्यात आली आहे.
परिसरात सोशल डिस्टंसिंग राखणे, योग्यरित्या मास्क लावणे, सॅनिटायजिंग करणे याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. या कार्यासाठी अनील लांबाडे, शंकर भोयर, अंकुश पाटील, वैभव चौधरी, विजय गोडबोले, गुड्डू गुप्ता, रवी अंबाडकर आदींनी सहकार्य केले.