नागपुरातील कोरोनाची स्थिती पुन्हा गंभीर वळणावर जात आहे. यातच सोमवारी चाचणीत मोठी घट आली. ६,६१४ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत १९.२९ टक्के, १,२७६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मृत्यूंची संख्या वाढून ११ झाली.
नागपूर : कोरोनाची स्थिती पुन्हा गंभीर वळणावर जात आहे. यातच सोमवारी चाचणीत मोठी घट आली. ६,६१४ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत १९.२९ टक्के, १,२७६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मृत्यूंची संख्या वाढून ११ झाली. नागपूर जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या १,५९,००५ तर मृतांची संख्या ४,४०१ झाली आहे. चिंता वाढविणारी बाब म्हणजे, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजारांवर गेली आहे. यातील ८,११६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. ही संख्या वाढत असली तरी आमदार निवासातील कोविड केअर सेंटर सुरू करण्यास कोणीच पुढाकार घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नागपूर जिल्ह्यात २१ फेब्रुवारीनंतर ८ मार्च रोजी कोरोना संशयित रुग्णांच्या चाचणीत मोठी घसरण झाली. मागील सहा दिवसांपासून १० हजारांवर चाचण्या होत होत्या. परंतु आज ५,४९४ आरटीपीसीआर, ११२० रॅपिड अँटिजेन अशा एकूण ६,६१४ चाचण्या झाल्या. यात आरटीपीसीआरमधून १०९० तर अँटिजेनमधून १८६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात एम्सच्या प्रयोगशाळेत १०२, मेडिकलच्या प्रयोगशाळेत १३७, मेयोच्या प्रयोगशाळेत १२२, नीरीच्या प्रयोगशाळेत ६१, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत १०६ तर खासगी लॅबमधून ५६२ रुग्णांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले.
शहरात १,०३७ तर ग्रामीणमध्ये २३६ रुग्णांची भर
कोरोनाच्या रुग्णसंख्येत शहरातील १,०३७, ग्रामीणमधील २३६ तर जिल्ह्याबाहेरील ३ नव्या रुग्णांची भर पडली. मृतांमध्ये शहरातील ७, ग्रामीणमधील १ तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्णांचे मृत्यू झाले. शहरात आतापर्यंत १,२६,८७९ रुग्ण व २,८३७ मृत्यूंची नोंद झाली. ग्रामीणमध्ये ३१,१६२ रुग्ण व ७८२ मृत्यू तर जिल्ह्याबाहेरील ७८२ रुग्ण व ९६४ बाधितांचे बळी गेले आहेत.
१,०३९ रुग्ण बरे
दिलासादायक म्हणजे, रुग्णसंख्या वाढत असताना आज १,०३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत १,४३,५२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. परंतु बरे होण्याचा हा दर फेब्रुवारी महिन्यात ९४ टक्क्यांवर होता तो आता ९०.२७ टक्क्यांवर आला आहे. शहरातील १,१५,९१७ तर ग्रामीण भागातील २७,६११ रुग्ण बरे झाले आहेत.
दैनंदिन चाचण्या :. ६,६१४
बाधित रुग्णसंख्या : १,५९,००५
बरे झालेले रुग्ण :१,४३,५२८
सक्रिय रुग्ण : ११,०७६
मृत्यू : ४,४०१