नागपूर : जिल्ह्य़ात करोनाचे पाच प्रकारचे नवीन स्ट्रेन (उत्परिवर्तित विषाणू) आढळल्याचे स्पष्ट झाले असून त्यामुळेच नागपुरात करोनाचा उद्रेक झाल्याचा अंदाज वैद्यकीय क्षेत्रात वर्तवला जात आहे. एवढय़ा प्रकारच्या नवीन स्ट्रेनमुळे वैद्यकीय क्षेत्रातही चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, शहरात करोनाचा नवीन स्ट्रेन असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी एप्रिलमध्येच एका पत्रकार परिषदेत सांगितले होते.
नागपुरातील मेयो आणि मेडिकलमधून सुमारे ७४ नमुने डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत तपासणीसाठी दिल्ली तसेच पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यांचे अहवाल मार्च आणि एप्रिलच्या सुरुवातीला प्रशासनाला मिळाले. यामध्ये करोनाच्या ५ नवीन रूपांची ओळख पटली. यापैकी १ नमुना ई४८के हा आहे. ३ नमुन्यात ई४८४क्यू हे रूप तर २ नमुन्यांत एन४४०के हे रूप आढळले. २६ नमुन्यांमध्ये ई४८४क्य: एल४५२आर आणि ७ नमुन्यांत एल४५२आर रूप आढळले आहेत. उर्वरित ३५ नमुन्यांमध्ये जुनेच स्ट्रेन आढळले आहेत. या पाचही स्ट्रेनमुळे प्रतिकारशक्ती कमी होते. या नमुन्याचा अहवाल फेब्रुवारीत पाठवण्यात आला असला तरी विलंबाने म्हणजे मार्चच्या शेवटी आणि एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात मिळाला.
या नवीन स्ट्रेनमुळे रुग्णांत ताणतणावात वाढ, डोक्याच्या तसेच डोळ्यांच्या वेदना, ८ ते १२ दिवस राहणारा ताप, सर्दी, खोकल्यासह अंगदुखीचाही त्रास दिसून आला. जिल्ह्य़ात करोनाचा उद्रेक आताही कायम आहे. सध्या जिल्ह्य़ातील सर्वच भागात मोठय़ा संख्येने करोनाग्रस्त आढळून येत आहेत. दुसरीकडे उपचारादरम्यान होणारे मृत्यूही चिंतेची बाब आहे. या करोना उद्रेकाला नवीन स्ट्रेन जबाबदार असल्याच्या वृत्ताला मेयोतील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे.
शहरातील २०२१ मधील करोनाची स्थिती
महिना नवे रुग्ण मृत्यू
जानेवारी ८,२७५ १२२
फेब्रुवारी १२,६४४ १३
मार्च ५९,८३२ ४७५
एप्रिल १,१६,७४२ १,२३२