CoronaVirus in Nagpur : नागपुरात आणखी ९ पॉझिटिव्ह

उपराजधानीवर कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मंगळवारी पुन्हा ९ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले. या रुग्णांसह नागपुरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५६ झाली आहे.

corona-positive

नागपुर: उपराजधानीवर कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मंगळवारी पुन्हा ९ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले. या रुग्णांसह नागपुरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५६ झाली आहे. विशेष म्हणजे, आज नोंद झालेले सर्वच रुग्ण संतरजीपुऱ्यातील आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या पुढाकारामुळे नागपुरात आणखी दोन प्रयोगशाळा सुरू झाल्या आहेत. नमुने चाचणीची संख्या वाढली आहे. गेल्या तीन दिवसांत आढळून आलेले २९ रुग्ण हे संस्थात्मक विलगीकरण कक्षातील आहेत. यामुळे रुग्ण वाढत असले तरी त्यांच्यापासून इतरांना होणारा संपर्क नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. आज नोंद झालेल्या नऊपैकी तीन रुग्णांमध्ये आठ व १८ वर्षांची मुलगी व ५८ वर्षीय पुरुष आहे. हे सर्व सतरंजीपुऱ्यातील बाधित मृताच्या नातेवाईकांच्या संपर्कातील आहेत. यांचे नमुने मेडिकलच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आले. तर उर्वरित सहा रुग्णांमध्ये ७०, २८ व १९ वर्षीय पुरुष तर ५० व दोन ४५ वर्षीय महिला आहेत. यातील एक रुग्ण इतवारी येथील आहे. तर उर्वरित पाच रुग्ण सतरंजीपुऱ्यातील आहेत. यांचे नमुने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) तपासले आहेत. यातील चौघांना मेयोत तर उर्वरित पाच रुग्णांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

१८० नमुने निगेटिव्ह

मेयो, मेडिकल व एम्सने मिळून १८० नमुने तपासले. यात नऊ पॉझिटिव्ह नमुने वगळता १७१ नमुने निगेटिव्ह आले आहेत. एकीकडे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना एवढ्या मोठ्या संख्येत नमुने निगेटिव्ह येत असल्याने, सोबतच कोरोनामुक्त होऊन रुग्ण रुग्णालयातून घरी जात असल्याने मोठा दिलासा आरोग्य यंत्रणेला मिळाला आहे.

एकट्या वर्ध्यातील ४० नमुन्यांची तपासणी

काही दिवसांपूर्वी वर्ध्यात उत्तर प्रदेशात जात असलेल्या ट्रक पोलिसांनी पकडला होता. यात ४० वर लोक लपून बसले होते. या सर्व लोकांना वर्ध्यातच क्वारंटाईन करून ठेवण्यात आले. यांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून तपासणी केली जाणार आहे.

अलगीकरणातून १२८ संशयितांना पाठविले घरी

आमदार निवास, वनामती, रविभवन, लोणारा व आजपासून सुरू झालेल्या सिम्बॉयसिस या संस्थात्मक अलगीकरण कक्षातून १२८ संशयितांना घरी पाठविण्यात आले. यांना अलगीकरण कक्षात १४ दिवस झाले असून अहवालही निगेटिव्ह आला आहे. सध्या या सहाही अलगीकरण कक्षात ४६७ संशयित आहेत.

कोरोनाची आजची स्थिती

दैनिक संशयित ५८
दैनिक तपासणी नमुने १८०
दैनिक निगेटिव्ह नमुने १७१
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ५६
नागपुरातील मृत्यू १
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ११
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ९७८
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित ४६७

Also Read- सतरंजीपूरा झोन अंतर्गत दलालपूरा परिसर सील