नागपुर: करोनाची तिसरी लाट लहान मुलांना लक्ष्य करणार असल्याचे बोलले जात असताना, ती येण्याच्या आधीच गेल्या एप्रिल महिन्यात नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) शून्य ते २० या वयोगटातील सात मुलांचा मृत्यू झाला आहे.
करोना लहान मुलांना काही करीत नाही, कारण त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते, असे पहिल्या लाटेपर्यंत बोलले जायचे. मात्र, दुसऱ्या लाटेतच करोनाने लहान मुलांनाही कवेत घेणे सुरू केले. त्यामुळे लहान मुले बाधित होण्याची संख्या हजाराच्यावर आहे. त्यातही शून्य ते २० वयोगटात सात जणांचा मृत्यू होणे हेही गंभीर समजले जात आहे.
एप्रिल महिन्यात मेडिकलमध्ये जे १,३६७ मृत्यू झाले त्यात पुरुषांची संख्या अधिक आहे. महिनाभरात ८५५ पुरुषांनी तर ५१६ महिलांनी जीव गमावला. करोनामुळे जे मृत्यू झाले, त्यात ५७९ रुग्णांना इतर गंभीर आजार असल्याचेही आढळून आले आहे.
यसंदभार्त मेडिकलच्या औषधीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील म्हणाले की, सध्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. यात लहान मुले व पौगंडावस्थेतील मुले यांना धोका असल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्यांना सांभाळून ठेवले पाहिजे. ते केले तर तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी राहू शकतो.
वयोगटानुसार मृत्युसंख्या
शून्य ते २० : ७
२० ते ३० : ५५
३० ते ४० : १४४
४० ते ५० : २६५
५० ते ६० : ३६४
६० ते ७० : २९६
७० वर्षांच्या पुढे : २४६