मुंबई: चीनमधून सुरू झालेल्या करोना विषाणूच्या आजाराने भारतातही हातपाय पसरण्यास प्रारंभ केल्याने धास्तावलेल्या राज्य व केंद्र सरकारने करोनाला रोखण्यासाठी कंबर कसली आहे. राज्य सरकारने रविवारी विविध ठिकाणी चाचण्यांची सुविधा सुरू करण्याची घोषणा केली. त्याचवेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी रविवारी फोन करून परिस्थितीची माहिती जाणून घेतली.
रविवारी औरंगाबाद व कल्याण येथे करोनाचा प्रत्येकी एक नवीन रुग्ण आढळून आला. त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या ३३वर गेली आहे. औरंगाबादमधील रुग्णालयात दाखल असलेल्या ५९ वर्षीय महिलेने रशिया आणि कझाकिस्तान येथे प्रवास केलेला आहे. तिची प्रकृती स्थिर आहे. राज्यात रविवारी ९५ संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात कोवीड-१९ अधिसूचना लागू झाल्याने आवश्यकता भासल्यास विलगीकरणासाठी खासगी रुग्णालयातील खाटा अधिग्रहित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळा चाचण्यांची क्षमता बुधवारपासून रोजच्या १००वरून ३५० एवढी वाढवण्यात येणार आहे. केईएम रुग्णालयातही दिवसाला २५० चाचण्यांची यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. सोबतच १५ दिवसात जेजे, हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुणे येथील बीजे कॉलेजमध्ये चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. त्याखेरीज धुळे, औरंगाबाद, मिरज, सोलापूर येथे प्रयोगशाळा सुरू करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
देशात महाराष्ट्रात सर्वाधिक ३३ जणांना करोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी रविवारी फोनवरून १५ मिनिटे चर्चा केली. करोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिल्याचे समजते. यावेळी मोदींनी राज्यातील करोनाची लागण झालेले रुग्ण, संशयित रुग्णांची माहिती घेतली. उद्धव ठाकरे यांनीही राज्य सरकारने करोना रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची पंतप्रधानांना माहिती दिल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
Also Read- नागपूर: मेयोतून करोना संशयित चार रुग्ण पळाले