नागपूर : नागपूर विभागीय मध्य क्षेत्राच्या मुख्य आयकर आयुक्त १४ जुलैला कोरोना पॉझिटिव्ह होत्या. आता २८ जुलैच्या रात्री आयकर आयुक्त (प्रशासन) कार्यालयातील एक कर्मचारी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आयकर विभागात एकच खळबळ उडाली आहे. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात विभागातील किती अधिकारी, कर्मचारी आणि नातेवाईक आले आहेत, याचा शोध घेण्यात येत आहे.
कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्याची तब्येत तीन दिवसांपासून खराब होती. त्यानंतरही तो कामावर उपस्थित राहत होता. या तीन दिवसात वा त्यापूर्वी तो कुणाकुणाच्या संपर्कात आला आहे, याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाचे अधिकारी गोळा करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट घेण्यात येणार वा नाही किंवा सर्वांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती समजू शकली नाही. सूत्रांनी सांगितले की, प्रशासनाच्या आदेशानुसार कार्यालयात १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक असताना तसेच आयकर विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये बहुतांश कामे बंद असतानाही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती असते. याशिवाय अनेक वरिष्ठ अधिकारी कार्यालयीन कामानिमित्त पुणे, मुंबई आणि दिल्लीला विमानाने जातात. ते परत आल्यानंतर क्वारंटाईन होत नाहीत. ही बाब या कार्यालयात नेहमीचीच आहे. पूर्वीप्रमाणेच आयकर आयुक्तांचे (प्रशासन) कार्यालय सॅनिटाईझ्ड करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
कर्मचाऱ्याची तब्येत तीन दिवसांपासून खराब असतानाही त्याला कामावर का बोलविण्यात येत होते, याची चौकशी करण्याची मागणी आयकर विभागाच्या कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना केवळ १५ टक्के अधिकारी आणि कर्मचाºयांना कामावर बोलवावे, अशी मागणीही संघटनांनी केली आहे.