माझ्या रुग्णालयातील ऑक्सिजन संपत चालला आहे. तो कुठून मिळेल याची चिन्हे नाहीत. आता रुग्णांचे कसे हाेणार? मी आता तिसऱ्या मजल्यावर आलो आहे. आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही…’ असे नाशिकमधील एका रुग्णालयाचे प्रशासन पाहणारा व्यवस्थापक फाेनवर सांगू लागला. ते ऐकून औरंगाबादेतील धूत हॉस्पिटलचे सीईओ डॉ. हिमांशू गुप्ता हादरलेच. प्रसंगावधान राखून आपल्या पूर्वाश्रमीच्या या सहकाऱ्याला बोलण्यात गुंतवले.
दुसरीकडे नाशिकमधील प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञांना तिकडे पाठवून या अधिकाऱ्याचे मन वळवले व त्याला आत्महत्येपासून रोखले. दाेन दिवसांपूर्वी नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयात २४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्याच दिवशी म्हणजे २१ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता डॉ. गुप्ता यांच्या मोबाइलची रिंग वाजली. एकेकाळी त्यांच्याच हाताखाली काम केलेल्या सहकाऱ्याचा कॉल होता. डॉ. गुप्तांनी बोलणे सुरू केले.
मॅनेजमेंट म्हणतेय बोर्ड लावून टाका
मॅनेजमेंटला कळवले तर त्यांनी ऑक्सिजन संपल्याचा बोर्ड लावून टाका, रुग्णांच्या जिवासाठी जबाबदार नाही, असे लिहिण्यास सांगितले आहे. असे काही करणे मला शक्य नाही म्हणून मी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरील माझ्या रूममध्ये आलोय. आतून दरवाजा बंद करून घेतलाय. भयानक डिप्रेशन आलंय. आत्महत्या हा एकमेव पर्याय दिसताेय. तिसऱ्या मजल्यावरून उडी मारणार आहे.’ त्यांचे हे निर्वाणीचे बोलणे ऐकून डॉ. गुप्ताही चिंतेत पडले. ४५ वर्षे वयाच्या त्या जुन्या सहकाऱ्याला नेमकी कशी मदत करावी याचा विचार ते करू लागले.
मग त्यांना एक युक्ती सुचली. त्यांनी त्याला बोलण्यात गुंतवणे सुरू केले. डॉ. गुप्तांनी नाशिकमधील एका मित्र समुपदेशकाला दुसऱ्या मोबाइलवरून संपर्क साधला. त्याला प्रकरण समजावून सांगितले. आणि तातडीने त्या अधिकाऱ्यापर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्यास सांगितले. डॉ. गुप्तांनी अधिकाऱ्याला दरवाजा उघडण्याची विनंती केली. समुपदेशकाचा रूममध्ये प्रवेश झाला. त्याने प्रकरण पुन्हा एकदा समजावून घेतले आणि अनेक उदाहरणे देत ताण कमी केला. दोन तासांनी ऑक्सिजनचा साठाही आला. त्याचाही फरक पडला.
माझ्यावर १०० रुग्णांची जबाबदारी, त्यांचे काय होणार?
सध्या नाशिकमध्ये १०० बेडच्या रुग्णालयात प्रशासकीय व्यवस्थापक पदावर काम करत असणारे हे अधिकारी स्फुंदून स्फुंदून रडत होते. ते सांगत होते की, ‘माझ्या रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे. थोड्या वेळापूर्वीच इथं मोठी दुर्घटना घडली आहे. त्यामुळे ऑक्सिजन मिळेल याची चिन्हे दिसत नाहीत. पुरवठादार तीन तासांत देतो असे म्हणतो. पण त्याच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवता येत नाही. थोडासा वेळ झाला तर मोठी गडबड होईल. माझ्यावर १०० रुग्णांची जबाबदारी आहे. त्यातील १५ आयसीयू, २५ ऑक्सिजनचे आहेत. त्यांचे काय होणार याची चिंता लागलीय.