लसीकरण केंद्रावर गोंधळ कायम, सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचं दिसून आलं

लसीकरण केंद्रावर गोंधळ कायम, सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचं दिसून आलं

देशात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली असून त्यामध्ये 18 ते 45 वयोगटातील सर्वांना लस देण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात आजपासून व्यापक लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यात 18 ते 45 वयोगटातील सर्वांना लस देण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने कमी प्रमाणात लस वाटप करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणच्या लसीकरण केंद्रावर गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं असून सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचं दिसून आलं आहे.

पुण्यात गोंधळ कायम
पुणे लसीकरण केंद्रावर आजही गोंधळ कायम आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी पुणे जिल्ह्यात 20 हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यात फक्त 19 केंद्र सुरू असून 2 केंद्र पुणे शहरात आहेत. त्यामध्ये कमला नेहरू रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय येरवडा येथे आजच्या दिवशी लसीकरण केलं जाणार आहे. शहरात एकूण 700 नागरिकांना लस दिली जाणार आहे. मात्र अनेकांनी नोंदणी केली असली तरी नियोजन केंद्र आणि वेळ निश्चित होत नसल्यानं लसीकरण केंद्रावर गोंधळ कायम असून नागरिकांनी मोठी गर्दी केलीय.

नांदेडमध्ये लसी नसल्याचा रुग्णालयासमोर बोर्ड
नांदेड जिल्ह्यातील जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याचे बोर्ड लावण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील व शहरातील काही मोजक्या रुग्णालयामध्ये कोविड लसीकरण अत्यंत सुरळीतपणे सुरू होते. मात्र या रुग्णालयांना आता गेल्या तीन दिवसांपासून लस पुरवठा झालाच नाही. परिणामी 45 वर्षापुढील अनेक नागरिकांच्या लसीच्या दुसऱ्या मात्रेचा खोळंबा झालाय. राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक मोहीम सरकारी तसेच निमसरकारी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविताना विविध शहरातील निवडक सुसज्ज खासगी व शासकीय रुग्णालयावर ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. ती सशुल्क असली तरी शहरातील अनेक नागरिकांनी शासकीय लसीकरण केंद्रावर जाण्याऐवजी खाजगी रुग्णालयांना पसंती दर्शवली होती.

गेल्या महिन्यात या रुग्णालयांना गरजेपेक्षा कमी लस पुरवठा झाला.पण गेल्या तीन दिवसांपासून शहरातील व जिल्ह्यातील रुग्णालयांना लस पुरवठा न झाल्यामुळे एक वेळा लसीकरण केलेल्या अनेक जेष्ठ नागरिकांची लस कोंडी झालीय. नांदेड शहरातील श्याम नगर, पौर्णिमानगर, जंगमवाडी सह शहरातील अनेक लसीकरण केंद्र लस अभावी बंद पडल्याचे चित्र आहे. लसीकरणाच्या सुरवातीच्या टप्प्यात केवळ शासकीय रुग्णालयात लसीकरणास सुरवात करण्यात आली होती. शहरातील व जिल्ह्यातील हजारों नागरिकांनी या रुग्णालयातून कोवॅक्सिन ची पहिली मात्रा घेतली होती. परंतु आता खासगी व शासकीय आशा दोन्ही रुग्णालयात लस उपलब्ध नसल्यामुळे दुसऱ्या मात्रेचे नियोजन कसे करायचे असा प्रश्न रुग्णांसमोर उभा आहे.

बुलढाणा जिल्ह्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
बुलडाणा जिल्ह्यात आज 18 ते 45 वर्ष वयोगटातील नागरिकांना लस देण्यास सुरुवात केलीय. मात्र सामान्य रुग्णालयाच्या ढिसाळ नियोजनामुळे लसीकरण केंद्रात तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळाली. तर याठिकाणी सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडाला असल्याचं चित्र दिसलं. आजपासून राज्यात व्यापक लसीकरण सुरू झालं आहे. यासाठी बुलडाणा जिल्ह्यासाठी 7500 लस उपलब्ध झाली असून जिल्ह्यात 5 ठिकाणी याचे वाटप केलेय. मात्र आज सकाळपासूनच नागरिकांनी केंद्रावर गर्दी केल्याचे पाहायला मिळालंय. यामध्ये वृद्ध नागरिकसुद्धा आहेत. प्रशासनाने यापूर्वीच नियोजन करणे आवश्यक असताना ृ त्याकडे दुर्लक्ष केलं गेलंय. त्यामुळे रुग्णालय प्रशासन यावर किती संवेदनशील आहे हे दिसतेय.

नाशिकमध्ये लसीकरण केंद्रावर गोंधळ
कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम व्यापक स्वरूपात राबविण्याची घोषणा सरकारने केली. मात्र लसच उपलब्ध नसल्याने महाराष्ट्र दिनी या मोहिमेचा फज्जा उडाल्याच बघायला मिळत आहे. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात गोंधळ उडाला असून पोलिसांना पाचारण करण्यात आलं आहे.

नाशिक जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटासाठी केवळ 5 ठिकाणी लसीकरण केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. यात नाशिक शहरात 2,मालेगाव मनपाचे 1 आणि ग्रामीण भागात 2 केंद्र आहे. नाशिक मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णलयात 18 ते 44 वयोगटासाठी लस दिली जाणार आहेत. जिल्ह्यासाठी केवळ दहा हजार लस आल्या आहेत. इंदिरा गांधी रुग्णलयात आज सकाळी दुसरा डोस घेण्यासाठी 45 वयोगटावरील आणि ज्येष्ठ नागरिक दाखल झाले होते. त्याना लस दिली नसल्याने एकच गोंधळ उडाला, नागरिक संतप्त झाले. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण पोलीस आणि नागरिकांतच वाद झाला. अखेर समजूत घालून नागरिकांना माघारी पाठविण्यात आले. मात्र पुन्हा कधी लस घेण्यासाठी यावे याबाबत स्पष्टता नसल्याने गोंधळात आणखी भर पडली आहे.

धुळे शहरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
महाराष्ट्र दिनापासून सुरू झालेल्या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून धुळे जिल्ह्यासाठी 7 हजार लसींचा डोस प्राप्त झाले आहेत. शहरात फक्त एकच ठिकाणी हे लसीकरण सुरू असून याठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे.