नागपूर : कुख्यात गुंड व चंद्रपूरमधील कोळसाामाफिया शेख हाजी बाबा शेख सरवर ऊर्फ हाजी याच्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी एसटीएसचे वणीत छापासत्र सुरूच असून, एटीएसच्या पथकाने त्याच्या आणखी एका साथीदाराला बुधवारी रात्री वणी येथे अटक केली.
शस्त्रतस्करी प्रकरणातील अटकेतील तस्करांची संख्या आता तीन झाली आहे. मंगेश ऊर्फ पप्पू उखनकर (वय ३३,रा.वणी),असे अटकेतील साथीदाराचे नाव आहे. यापूर्वी पोलिसांनी हाजीसह जितेंद्रसिंग ऊर्फ कालू सज्जनसिंग (वय ३८,रा.वणी) या दोघांना अटक केली होती. तिघांकडून पोलिसांनी देशीकट्टा व काडतुसे जप्त केल्याची माहिती आहे. पप्पू हा जीम चालवितो. तो हाजी याच्या खास विश्वासूंपैकी एक आहे. हाजी याच्या इशाऱ्यावरून तो जीममधील युवकांना आपल्या टोळीत सहभागी करून घेत होता. पैशाचे आमिष दाखवून त्यांना शस्त्रतस्करी करण्यास भाग पाडत होता, असेही कळते.
हाजी हा चंद्रपूर ,यवतमाळसह मध्य भारतातील मोठा शस्त्र तस्कर आहे. कालू व पप्पू हे हाजीसाठी काम करतात. काही दिवसांपूर्वी मुंबई येथील एटीएसच्या पथकाने नागपुरात बरोनी-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये सुपत सिंग (रा. लक्ष्मीपूर, मुंगेर, बिहार) व यवतमाळ येथील संजय संदीपान खरे या दोघांना अटक केली होती. या दोघांकडून दोन पिस्तूल व २० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. या दोघांच्या चौकशीदरम्यान हाजी याचे नाव समोर आले होते. त्यानंतर एटीएसच्या पथकाने सोमवारी हाजी याला वर्धेतील गिरड येथे तर कालू व पप्पूला वणीत अटक केली. एटीएसच्या पथकाने तिघांनाही गुरुवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांची ११ फेब्रुवारीपर्यंत एटीएस कोठडीत रवानगी केली.
अधिक वाचा : कामठी येथून ४६ किलो गांजा जप्त, तिघांना अटक