पाकिस्तानातील टोळधाडीचं संकट विदर्भात धडकलं; संत्रा, मोसंबी आणि भाजीपाल्यावर आक्रमण

नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये असलेल्या संत्रा, मोसंबी आणि भाजीपाल्यावर या टोळधाडीने आक्रमण केले आहे.

locust-infestation

नागपूर : एका बाजूला कोरोनाचे संकट तर दुसरीकडे तोंडावर आलेल्या मान्सूनच्या लगबगीने पेरणीकरीता शेतीच्या मशागतीत विदर्भातील शेतकऱी व्यस्‍त असताना, आता शेतकऱ्यांसमोर नाकतोड्यांच्या टोळधाडीचे महाभयंकर संकट उभे ठाकले आहे. पाकिस्तानातील टोळधाडीचं संकट राजस्थाननंतर आता मध्य प्रदेशमार्गे महाराष्ट्रातील विदर्भात धडकलं आहे. नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये असलेल्या संत्रा, मोसंबी आणि भाजीपाल्यावर या टोळधाडीने आक्रमण केले आहे. यामुळे ऐन संकटाच्या काळात शेतकरी आणखीनच भयभीत झाला आहे.

मध्य प्रदेश मार्गे सर्वप्रथम अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी या भागातून ही टोळधाड नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड या तालुक्यातून वर्धा जिल्ह्यात पोहोचली आहे. सध्या ही टोळधाड काटोल नरखेड आणि वर्धा तालुक्यातील काही भागात उडताना दिसत आहे. या टोळधाडीतील टोळ म्हणजेच नाकतोडे हे सर्व प्रकारच्या झाडांची पाने खातात. झाडाला केवळ खोड,काड्याच शिल्लक राहतात. टोळधाड ही समूहाने पिकावर आक्रमण करते, एका समूहात टोळची संख्या कोट्यवधी मध्ये असते आणि ती पाच दहा किलोमीटर अंतरावर पसरते.

विदर्भातील काटोल, नरखेड, मोर्शी, वरूड या भागात सध्या भाजीपाला, संत्रा, मोसंबी, लिंबू या झाडांना टोळधाडीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या टोळधाडीपासून शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण कसे करावे, याबाबत प्रशासनही चिंतेत आहे.

विदर्भातील अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शेतकऱ्यांना नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या टोळधाडीने शेतकऱ्यांच्या शेतातील संत्रा, मका, मोसंबी, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान केले.

या टोळधाडीमध्ये कोट्यवधींच्या संख्येने नाकतोडे आहेत. एकावेळी पाच ते दहा किलोमीटर परिघातील शेकडो एकर शेतजमिनीतील पिकांचे रात्रीच्या वेळी हे नाकतोडे नुकसान करतात. नागपुर आणि अमरावतीच्या जिल्हा प्रशासनाने या टोळधाडीची दखल घेऊन उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे.

Also Read- विमान प्रवाशांसाठी राज्य शासनाचे दिशानिर्देश जाहीर