९ जुलै रोजी विधानसभेत छगन भुजबळांची एंट्री – नागपुर पावसाळी अधिवेशन

छगन भुजबळ
नागपुर :- नुकतेच तुरुंगातुन जामिनावर बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात हजेरी  लावणार आहेत. उपराजधानित सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशन या निमित्ताने तब्बल अडीच वर्षानंतर छगन भूजबळ पुन्हा राजकारणाला सुरुवात करणार आहे.
गेल्या ४ जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवशेनाला सुरुवात झाली.मात्र, भुजबळांवर उपचार सुरु असल्यामुळे ते त्यावेळी अधिवेशनात सहभाग घेऊ शकले नाही. मात्र, आता ते सोमवारी ९ जुलै रोजी सभागृहात उपस्थित राहतील, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले.
रविवार ८ जुलैला भुजबळ नागपुरात दाखल होत असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. संध्याकाळी पाच वाजता भुजबळ यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल, त्या पश्चात ढोल ताश्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे यांनी दिलेली आहे. विदर्भातल्या सहा जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने यावेळी कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचेही ते म्हणाले. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला होत असलेला विलंब, जात पडताळणीच्या समस्या यावर आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी भुजबळांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक ही आयोजित केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुस्लीम ओबीसी नेत्यांना भेटून भुजबळ यांनी आपल्या राजकारणाची दिशा पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनाइजेशनचे मुंबई अध्यक्ष निजामुद्दीन राईन यांनी भुजबळ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. देशातल्या मुस्लीम ओबीसींच्या प्रश्नावर ही संघटना काम करत असून नागपूरच्या अधिवेशनानंतर या संघटनेच्या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेत ते भाग घेणार आहे.