CoronaVirus News: नागपूरकरांनो वागणूक बदला, अन्यथा कर्फ्यू अटळ – तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे

नागपूर : शहरात साडेतीन महिन्यांत ४५० कोरोनाबाधित होते, तर ११ जणांचा मृत्यू झाला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर दोन हजार बाधित झाले, तर ३८ जणांचा मृत्यू झाला. सामान्य जीवन जगण्याची मुभा दिली, परंतु कोविड-१९ च्या नियमांचे पालन होताना दिसत नाही.

वागणूक व सवयी बदलाव्या लागतील, नवीन जीवनपद्धती स्वीकारावी लागेल. अन्यथा कर्फ्यूसह लॉकडाऊन लागू करावा लागेल. यात जीवनावश्यक वस्तूही मिळणार नाही, असे इशारावजा आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केले. दुकानात पाचहून अधिक लोकांना मनाई आहे. परंतु २० ते २५ लोक दिसतात. नियम पाळावेत म्हणून दुकानदारांना १० हजारापर्यंत दंड केला. यात सुधारणा झाली नाही तर ५० हजार ते १ लाखापर्यंत दंड केला जाईल, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले.

कर्फ्यू लावण्यापूर्वी शंभरवेळा विचार करा : महापौर

मध्यमवर्गीय दुकानदारांची परिस्थिती बिकट आहे. याचा विचार करता नागपूर शहरात कर्फ्यू, लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी मनपा आयुक्तांनी शंभरवेळा विचार करावा, अशी विनंती महापौर संदीप जोशी यांनी केली आहे.