नागपूर : शहरात धावणाऱ्या आपली बसच्या सेवेत लवकरच ‘चलो अॅप’ सुरू होणार आहे. हे अॅप प्रत्येक प्रवाशांनी डाऊनलोड केल्यास त्यांना प्रवास करावयाच्या मार्ग व त्या मार्गावरून धावणाऱ्या बसची परिपूर्ण माहिती मिळणार आहे. शुक्रवारी परिवहन समितीच्या बैठकीत या प्रस्तावास मंजुरी प्रदान करण्यात आली. या अॅपला कार्यान्वित करण्यासाइी मनपावर कुठलाही आर्थिक भार पडणार नाही.
प्रवासी माहिती सिस्टमसाइी हे अॅप मनपातर्फे सुरू करण्यात येत आहे. झोपहोप टेक्नॉलॉजी प्रा. लिमिटेडतर्फे या अॅपची सेवा देण्यात येणार आहे. यासाठी लागणारा सर्व आर्थिक खर्च व संचलन खर्चही झोपहोपतर्फेच वहन करण्यात येणार आहे. या सेवेत खंड पडू नये व मनपाच्या व्यवस्थेमध्ये खंड पडू नये म्हणून बँक गॅरंटी देण्याचेही मान्य केले आहे. या कंपनीचे इतर कोणतेही उत्पादन मनपाला घ्यावयाचे नाही, असे बैठकीत ठरविण्यात आले. तिकिटिंग व आटोमोडेड फेअरकलेक्टिंग सिस्टम पूर्वापर सुरू असल्याने मनपाचे अंतर्गत बस वाहनताफा यावर संपूर्णपणे नियंत्रण व रिअलटाइम डाटा शहरातील नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
अॅपरवर काय दिसणार ?
– प्रवाशाला अॅन्ड्राइड मोबाइल संचावर संपूर्ण शहर बसच्या मार्गाचे विवरण दिसेल.
– प्रवासी घरी बसून चलो अॅप संचालित करू शकेल.
– प्रवाशाला प्रवास करावयाच्या मार्गावरील बस थांब्याची माहिती मिळेल.
– बस थांब्यावरून जाणाऱ्या बसचे नाव टाकल्यास मार्गावरच्या बसचा क्रमांक मिळेल.
– बसला किती वेळ लागेल, भाडे किती, जागा किती उपलब्ध याचीही माहिती मिळेल.
‘वॉटर एटीएम’ची वाढती मागणी
पूर्व नागपुरातील केडीके कॉलेज व सीताबर्डी डीपी रोड येथे ‘वॉटर एटीएम’च्या यशस्वी प्रयोगानंतर आता नगरसेवकांनीही वॉटर एटीएम मागितले आहे. १०० एलपीएच नॅचरल झिओलाइट फिल्टर बेस्ड वॉटर एटीएम नंदनवन परिसरातील केडीके कॉलेजसमोरील बस स्टॉपजवळ लावण्यात आला आहे. मोरभवन येथेही एक वॉटर एटीएम लावण्यात येणार आहे. एक एटीएम १२ लाख ३ हजार ६०० रूपये किमतीचा आहे. परिवहन समितीच्या बैठकीत नगरसेविका अभिरूची राजगिरे यांनी शांतीनगर घाटाजवळील चौकात, नगरसेविका अर्चना पाठक यांनी अनंतनगर बसस्टॉप जवळ आणि नगरसेविका मनीषा धावडे यांनी छापरूनगर चौकात वॉटर एटीएमची मागणी केली. मागणीनुसार या ठिकाणी एटीएम लावण्यासाठी येणाऱ्या एकंदरीत खर्चास अर्थसंकल्पातील तरतुदीच्या अधीन राहुन मान्यता प्रदान करण्यात आली.
अधिक वाचा : मोदींच्या मंत्रिमंडळात ५१ कोट्यधीश, हरसिमरत कौर सर्वात श्रीमंत