अनिल देशमुखांच्या घरावर सीबीआयची छापेमारी; काळी बॅग आणि पिवळ्या पिशव्यांमध्ये नेमकं काय?

Date:

नागपूर: तब्बल 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने छापे मारले आहेत. पीपीई किट्स घालून सीबीआयचे अधिकारी छापेमारी करत आहेत. यावेळी एक काळी बॅग आणि दोन मोठ्या पिवळ्या पिशव्याही सीबीआय अधिकाऱ्यांच्या हातात दिसत आहेत. त्यामुळे या बॅग आणि पिशव्यांमध्ये नक्की काय आहे? याचे गूढ वाढले आहे.

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटे मुंबईपासून ते नागपूरपर्यंतच्या अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे. एकूण दहा ठिकाणी हे छापे मारले आहेत. मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगला आणि वरळीतील सुखदा इमारतीतील फ्लॅटवर पहाटेच सीबीआयने छाप मारले आहेत. ही छापेमारी करताना स्थानिक पोलिसांना त्यांची गंधवर्ताही देण्यात आली नव्हती. छापेमारीचं वृत्त कळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बंदोबस्त वाढवला आहे.

नागपुरात सात ते आठ अधिकाऱ्यांची धाड                                                                               अनिल देशमुख हे नागपूरमध्ये आहेत. त्यांच्या नागपूर सिव्हिल लाईन परिसरातील निवासस्थानीही सीबीआयने धाड मारली आहे. पीपीई किट्स घालून काही लोक घरात झाडाझडती घेताना दिसत आहेत. तब्बल सात ते आठ अधिकारी देशमुखांच्या घरी आहेत. देशमुख यांच्यांशी काही सीबीआयचे कर्मचारी बोलत आहेत. सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या हातात एक काळी बॅग आणि दोन पिवळ्या पिशव्या होत्या. या पिशव्यांमध्ये महत्त्वाची कागदपत्रे असल्याचं बोललं जात आहे.

मॉर्निंग वॉकला जाऊन आले                                                                                                    दरम्यान, सीबीआयचा छापा पडण्यापूर्वी अनिल देशमुख हे आज सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊन आले होते. त्यांच्या चालकाने ही माहिती दिली. देशमुख यांच्या घरी सीबीआयने धाड मारल्याचं त्याला माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांचा चालक नेहमीप्रमाणे कामावर आला होता. देशमुख यांच्या घरी त्यांची पत्नी आणि मुलगा साहिलही असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

स्वीय सहायकाच्या घरावरही छापा                                                                                            देशमुख यांच्या स्वीय सहायकाच्या घरावरही सीबीआयने छापे मारले असून त्यांच्याकडूनही सीबीआय माहिती घेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

गृहमंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला                                                                                                  दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या घरावर छापे मारण्यात आल्याने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले. या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या 15 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा सुरू आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related