हायप्रोफाईल केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा अपघाती मृत्यू; CCTV मुळे घातपाताचा बळावला संशय

धनबाद जिल्हा सत्र न्यायालयात एका हायप्रोफाईल केसची सुनावणी करणारे न्यायाधीश उत्तम आनंद (Judge Uttam Anand) यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ (Accident CCTV) समोर आला आहे. अपघाताचा सीसीटीव्ही पाहून हे स्पष्ट दिसत आहे की रिक्षा (Auto) चालकाने त्यांना जाणून बुजून धडक दिली आहे. न्यायाधीश उत्तम आनंद हे हत्या प्रकरणासह इतरही अनेक महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी करत होते. माजी आमदाराचा जवळचा सहकाही असलेल्या रंजय हत्याकांड सारख्या महत्त्वाच्या प्रकरणांची ते सुनावणी करत होते. त्याच प्रकरणी आता पोलीस विविध अँगलने आपला तपास करत आहेत.

झारखंडमधील धनबादचे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीस उत्तम आनंद हे बुधवारी सकाळच्या सुमारास मॉर्निग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी रणधीर वर्मा चौकात मागून आलेल्या रिक्षाने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की न्यायाधीश उत्तम आनंद यांचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सीसीटीव्हीत दिसत आहे की, ऑटो आधी रस्त्याच्या मधोमधून चालत होती मात्र, अचानक रिक्षाने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या उत्तम आनंद यांना धडक दिली. त्यांना धडक दिल्यानंतर रिक्षाचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. या प्रकरणी पोलीस हत्येच्या अँगलने सुद्धा तपास करत आहेत.

चोरीच्या रिक्षाचा वापर

रिपोर्ट्सनुसार, पोलिसांच्या प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आली आहे की, ज्या रिक्षाने न्यायाधीश उत्तम आनंद यांना धडक दिली ती चोरी करण्यात आलेली होती. ही रिक्षा पाथरडीह निवासी सुगनी देवी यांच्या नावावर रजिस्टर्ड आहे आणि त्यांच्या मते रात्रीच्या सुमारास त्यांची रिक्षा चोरी झाली.