नरभक्षक वाघीण आता शार्पशूटरच्या नेमावर : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

tiger in नागपूर

नागपुर : विदर्भातील यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यात असलेल्या नरभक्षक वाघीण ला ठार करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. टी १ या नरभक्षक वाघिणीने २ वर्षात आतापर्यंत सरकारी आकड्यानुसार १२ शेतकरी, गुराखी यांची शिकार केली आहे. यापूर्वी देखील या वाघिणीला पकडण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र वनविभागाला त्यात अपयश आले. पण, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नरभक्षक वाघिणीला थेट गोळ्या घालण्यासाठी वनविभागाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पांढरकवडा तालुक्यातील राळेगाव, केळापूर, साखी, क्रिष्णापूर, फराटी, सुभानहेटी, गुबडहेटी, आठमरोडी आणि जीरामीरा या गावात या वाघिणीची मोठी दहशत आहे. या गावातील नागरिकांचे ११० पेक्षा जास्त पाळीव प्राणीही या वाघिणीने फस्त केले. येथील १० लोकांवर या वाघिणीने जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर त्यांचे भक्षणही याच वाघिणीने केले होते. वाघिणीची दहशत एवढी आहे की, परिसरातील गावकऱ्यांनी स्वतः ला घरात कैद करून घेतल्याचे चित्र आहे. याआधी वन विभागाने नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, ती हाती लागली नाही.

सर्वोच्च न्यायालयात पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक वाघिणीला ठार मारण्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी झाली. यात मुख्य वनसंरक्षकांनी दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्या. मदन लोकूर आणि दीपक गुप्ता यांनी कायम ठेवला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. सलमान खुर्शीद, आनंद ग्रोवर, आस्था शर्मा आणि तुषार मंडलेकर यांनी तर वन विभाग व राज्य सरकारतर्फे अॅड. कार्तिक शुकुल, सिद्धार्थ धर्माधिकारी व अभिलाष श्रीवास यांनी बाजू मांडली.

अधिक वाचा : विदर्भात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प चंद्रपूर येथे होण्याची शक्यता