आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यास केंद्र सरकारने दिलेली मुदत लवकरच 30 जूनपर्यंत आहे. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी हे दोन्ही दस्तावेज तातडीने लिंक करावेत, असे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज आहेत. कोणत्याही सरकारी अथवा आर्थिक कामांसाठी या दोन दस्तावेजांचे सादरीकरण करणे आवश्यक असते. या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारने हे दोन्ही दस्तावेज लिंक करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी वारंवार मुदतवाढ देखील दिली होती.
कोरोनामुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारने पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. तथापि, आता वाढवून दिलेली अंतिम मुदत संपण्यासाठी फारच कमी वेळ बाकी राहिला आहे. जर पॅनकार्ड आधारशी दिलेल्या मुदतीत लिंक केले नाही, तर ते रद्द होईल. अंतिम मुदत संपल्यानंतर एखाद्या वापरकर्त्याने पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक केले, तर पॅन कार्ड आधार क्रमांकाच्या सूचनेच्या तारखेपासून कार्यान्वित होईल, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
आयकर अधिनियमातील नवीन तरतुदीनुसार वापरकर्त्याने पॅन कार्ड मुदतीनंतर आधार कार्डशी जोडले, तर त्या वापरकर्त्याकडून याकरिता शुल्क घेतले जाणार आहे. मुदतीनंतर जोडल्यास संबंधित व्यक्तीला दंड भरावा लागणार आहे. मात्र, दंडाची ही रक्कम 1000 रुपयांपेक्षा कमी असेल. तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय किंवा बंद झाले, तर तुम्ही पॅनची गरज असलेले कोणतेही अर्थिक व्यवहार करू शकणार नाहीत. परंतु, जर पॅन आधार कार्डशी अंतिम मुदतीनंतर म्हणजेच 30 जूननंतर जोडले गेले, तर संबंधित व्यक्तीला कलम 234 एच अंतर्गत यासाठी शुल्क अदा करावे लागेल.