नागपुरातील इसमाचा ‘बुलडाणा पॅटर्न’ मृत्यू

corona

नागपूर: न्यूमोनियाचा उपचार सुरू असलेल्या बुलडाणा येथील रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर हा रुग्ण करोना पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आले आणि खळबळ उडाली. असाच प्रकार नागपुरातही घडला आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयात पाच दिवसांपासून न्यूमोनियाचा उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा करोनाबाधित होता की नाही, याबाबतच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास चिंतेत भर पडणार आहे.

मृत्यू झालेला हा ४५ वर्षीय संशयित रुग्ण १४ मार्च रोजी नवी दिल्ली येथून प्रवास करून नागपुरात आला होता. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. पाच दिवसांपूर्वी तो खासगी रुग्णालयात भरती झाला. या रुग्णाला न्यूमोनिया झाल्याचे निदान करण्यात आले. सोमवारी या रुग्णाची प्रकृती खालावली. अखेरीस त्याची मेयोत रवानगी करण्यात आली. मेयोत हलवून तासभर होत नाही तोच सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. मेयोतील डॉक्टरांची चिंता वाढली. ही माहिती तातडीने मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना देण्यात आली. डॉ. केवलिया यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडील बैठकीला उपस्थित होते. ती बैठक अर्धवट सोडून ते मेयोत आले. या संशयित रुग्णाच्या घशातील द्रवाचे नमुने तातडीने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. अहवालाची प्रतीक्षा आहे.

माहितीच दिली नाही

न्यूमोनियाची लक्षणे आणि करोनाची लक्षणे ही सारखी असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रत्येक न्यूमोनियाग्रस्त व्यक्तीला करोना संशयित गृहीत धरून तिच्या घशातील द्रवाच्या नमुन्याची चाचणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याउपरही या ४५ वर्षीय रुग्णावर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयाने लक्षणांची महापालिकेला माहिती दिली नसल्याचे समजते. न्यूमोनियाच्या रुग्णांकडे विशेष लक्ष द्या, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर आवाहन केले आहे. करोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबतच सामान्य रुग्ण बघणाऱ्या डॉक्टरांवरीलही जबाबदारी आता वाढली आहे.