नागपूर : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांची सुटका होईपर्यंत राज्यात भाजप आंदोलन करणार आहे, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज नागपुरात दिला आहे.
गोस्वामी यांना पनवेल येथील अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणी सापडलेल्या सुसाइड नोटमधील अक्षरं अन्वय नाईक यांच्या अक्षरांशी जुळते का याचाही खुलासा महाराष्ट्र पोलिसांनी जनतेपुढे करावा, असेही आवाहन चंद्रकांत पाटील यांनी आज नागपुरात केले.
ही आत्महत्या नसून हत्या असल्याचेच त्यावेळी सिध्द झाले होते. मात्र त्यानंतरही दोन वर्षांनी पुन्हा ही फाईल उघडून राज्य सरकारने सुडबुध्दीने ही कारवाई केली असल्याचा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे अर्णव गोस्वामी यांना अटक करून राज्य सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी चालविली असल्याचे पाटील म्हणाले.
जोपर्यंत अर्णव गोस्वामीची सुटका होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात भाजपचं आंदोलन सुरूच राहील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पाटील यांच्या नेतृत्वात नागपुरात गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, आमदार उपस्थित होते.