नागपुरात महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यामध्ये कलगीतुरा

नागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत सीताबर्डी ते लोकमान्यनगर मेट्रो स्थानक मार्गावरील अ‍ॅक्वा लाईनचे उदघाटन सोहळ्यात आज महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. नागपूरच्या विकास कामात सर्वपक्षीय नेते एकत्रित काम करूयात असा सूर नेत्यांचा असला तरी श्रेय लाटण्यावरून एकमेकांना टोले लगावण्याची संधी नेत्यांनी सोडली नाही.

महामेट्रो च्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत रिच 3 मध्ये सीताबर्डी ते लोकमान्यनगर मेट्रो स्थानक मार्गावरील अ‍ॅक्वा लाईनचे आज थाटात उद्घाटन पार पडले. सुभाषनगर मेट्रो स्थानकावर झालेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून मेट्रो ट्रेनला हिरवी झेंडी दाखविली. केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी हे देखील विडिओ लिंक द्वारे कार्यक्रमात सहभागी झाले. सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री नितीन राऊत, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, क्रीडा आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

यावेळी नागपूर मेट्रोसाठी भाजप नेत्यांनी पुढाकार घेतल्याचे सांगत भाजप नेत्यांनी आपली पाठ थोपटली. तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे नागपुरात मेट्रो धावत असल्याचे सांगितले.

महामेट्रोने उदघाटन सोहळ्याबाबत दिलेल्या जाहिरातीत राज्यातील मंत्र्यांची नावे नसल्याबाबत पालकमंत्री नितीन राऊत आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाराजी व्यक्त करून पुढे चुका करू नका असा सल्ला देखील दिला.

तर मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख माझे मित्र असा करून नितीन गडकरी यांच्या कामाची स्तुती केली त्याच वेळी हे आपलं सरकार आहे.

आम्हाला श्रेय लाटायचं नाही. आम्हाला जनतेचे आशीर्वाद हवे आहेत. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. तर गडकरी यांनी मेट्रो व ब्रॉडगेज मेट्रो बाबतचे प्रस्ताव त्रुटी दूर करून केंद्राकडून मान्य करून घ्यावे असे आवाहन केले.

नागपूर हे राज्याची उपराजधानी असून येथे सुरु असलेल्या विकासकामात श्रेयवाद आणण्यापेक्षा सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन विकासाची वाट धरावी अशी अपेक्षा नागपूरकरांनी व्यक्त केली.