नागपूर : पूर्व नागपुरातील भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जाणाऱ्या परिसरातील जनतेला कचऱ्याच्या समस्येपासून आता मुक्तता मिळणार आहे. नागपूर महानगरपालिकेने कचऱ्यापासून वीज बनविण्याच्या प्रकल्पांतर्गत भांडेवाडीत कचऱ्याचे वर्गीकरण सुरू केले आहे. कचरा वर्गीकरण करणाऱ्या संयंत्राचे लोकार्पण रविवारी (ता. १६) महापौर नंदा जिचकार आणि आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या संयंत्राच्या माध्यमातून वर्गीकरण आणि प्रक्रिया करण्यात आलेल्या कचऱ्याला वीज निर्मितीसाठी जबलपूरला नेण्यात येणार आहे. लोकार्पण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, विधी समितीचे सभापती धर्मपाल मेश्राम, लकडगंज झोन सभापती राजकुमार शाहू, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, एसएनडीएलचे महाव्यवस्थापक सुनील खुराणा, नगरसेविका मनिषा कोठे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार कृष्णा खोपडे म्हणाले, या संयंत्राच्या माध्यमातून पूर्व नागपुरातील जनतेला कचऱ्याच्या समस्येपासून मुक्त करण्यास मदत मिळेल. सोबतच वातावरणही प्रदूषणमुक्त होईल.
महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, सध्या १० एकर जागेला कचरामुक्त करण्यात येईल. त्यानंतर हळूहळू संपूर्ण परिसर कचरामुक्त होईल. नागपूर महानगरपालिकेने कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचे कंत्राट एस्सेल इंफ्राप्रोजेक्टस लिमिटेड आणि हिताची जोशैन इंडिया प्रा.लि. कंपनीला दिले आहे. यावेळी भाजयुमोचे सचिन करारे, मनोज अग्रवाल, हर्षद घाटोळे, ईएसएसईएल चे अनिलकुमार, मनपाचे कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, उपअभियंता प्रशांत वाघमारे, स्वच्छ भारत अभियानचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, झोनल अधिकारी रोहिदास राठोड, स्मार्ट सिटी प्रकल्प व्यवस्थापक माईन हसन उपस्थित होते.
अधिक वाचा : तंबाखू नियंत्रणासाठी एम्सचा पुढाकार, मनपा व टाटा ट्रस्टच्या सहकार्याने वैद्यकीय अधिका-यांसाठी कार्यशाळा