वादळ झालं आता ६ जूनला अस्मानी संकट; नासाने दिला इशारा

नासाच्या वेबसाईटवर यासंदर्भात देण्यात आली आहे माहिती

dangerous-asteroid

पृथ्वीसाठी धोकादायक ठरु शकणारी एकी एक लघुग्रह (अ‍ॅस्टेरॉईड) पृथ्वीजवळून जाणार असल्याचा इशारा अमेरिकेमधील अंतराळ संशोधन संस्था असणाऱ्या नासाने दिला आहे. जून महिन्यामध्ये हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार असून यासंदर्भातील माहिती नासानेच आपल्या वेबसाईटवर दिली आहे. या लघुग्रहाचे नाव ‘१६३३४८ (२००२ एनएच फोर)’ असं असल्याचे नासाच्या वेबसाईटवर म्हटलं आहे. सहा जून रोजी हा लघूग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार असून त्याचा व्यास २५० ते ५७० मीटर इतका असल्याचं नासानं म्हटलं आहे.

‘१६३३४८ (२००२ एनएच फोर)’ हा लघुग्रह पृथ्वीपासून ५.१ दशलक्ष किमी दूरून जाणारा असल्याचा अंदाज नासाने व्यक्त केला आहे. पृथ्वीजवळून जाताना या लघुग्रहाचा वेग ११.१० किमी प्रती सेकंद इतका असल्याची शक्यता अमेरिकेमधील काही प्रसारमाध्यमांनी व्यक्त केली आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार हा लघुग्रह ईडीटी (युरोपीयन वेळेनुसार) १२ वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजून १७ मिनिटांनी पृथ्वीच्या सर्वात जवळून जाणार आहे.

आतापर्यंत अंतराळामध्ये पृथ्वीच्या आजूबाजूच्या भागामध्ये १४० मीटरपेक्षा अधिक मोठा व्यास असणारे आठ हजारहूनअधिक लघुग्रह आढळून आले आहेत. हे सर्व लघुग्रह ७ दशलक्ष किमीपर्यंतच्या परिघामध्ये आढळून आले आहेत. नासाच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व खगोलीय वस्तूंचे वर्गीकरण हे पृथ्वीच्या दृष्टीने “संभाव्य धोकादायक” ठरणाऱ्या अंतराळातील वस्तूंमध्ये करण्यात आलं आहे. म्हणजेच संभाव्य धोकादायक ठरु शकणाऱ्या लघुग्रहांमध्ये ‘१६३३४८ (२००२ एनएच फोर)’ या लघुग्रहाचाही समावेश होतो. ‘स्पेस डॉट कॉम’च्या एका वृत्तानुसार, पृथ्वीच्या जवळपास असलेल्या अंतराळामध्ये एकूण २५ हजार लहान-मोठ्या आकाराचे लघुग्रह आहेत.

याच वर्षाच्या सुरुवातील, २०२० डीआर टू हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाण्याची शक्यता व्यक्त करणारे वृत्त समोर आलं होतं. २०२० डीआर टू चा व्यास हा सुमारे १९३५ फूट (५९० मीटर) इतका होता. एवढ्या मोठ्या आकाराचा एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर त्यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. प्लॅनेटरी सोसायटीच्या अंदाजानुसार ४६० फूटांहून (१४० मीटर) अधिक आकाराची कोणतीही खगोलीय वस्तू पृथ्वीवर आदळल्यास एखाद्या मोठ्या देशाच्या आकाराऐवढ्या परिसरामध्ये विनाश घडवू शकते. जर अशी एखादी गोष्ट अंतराळामधून पृथ्वीवर आदळली तर त्यामुळे होणारी जीवितहानी ही आतापर्यंतच्या मानवी इतिहासातील सर्वात मोठी जीवितहानी ठरेल अशी भीतीही व्यक्त करण्यात आली होती.

मात्र त्यानंतर नासाने अशाप्रकारे अंतराळातील वस्तू पृथ्वीवर आदळण्याची शक्यता नसल्याचे सांगत २०२० डीआर टू हा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार नसल्याचे स्पष्ट केलं. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांच्या सांगण्यानुसार ४६० फूटांहून (१४० मीटर) अधिक आकाराची कोणतीही खगोलीय वस्तू पृथ्वीवर आदळण्याची शक्यता खूपच कमी असते. शंभरपैकी केवळ एखाद्यावेळी अशी घटना घडू शकते असं खगोलशास्त्रज्ञ सांगतात.

Also Read- Apple tracks iPhones stolen from its stores during US protests