मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बालजीवनावर आधारित ‘चलो जिते है’ या चित्रपटाला मंगळवारी महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद लाभला. नानाजी देशमुख प्रतिष्ठान आणि पार्थ नॉलेज नेटवर्क यांनी एकत्र येऊन या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते.
या दोन्ही संघटनांनी सामाजिक भावनेतून हे आयोजन केले आणि तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करीत आपल्या या उपक्रमावर देखरेखही ठेवली. जिल्हा परिषदांच्या शाळांना त्यांनी या उपक्रमात सहभागी केले होते. जेथे डिजिटल शाळा आहेत, त्या या उपक्रमात सहभागी झाल्या, तर जेथे अद्याप डिजिटल शाळा नाहीत, तेथे सामाजिक संघटनांनी चित्रपट दाखविण्याची व्यवस्था केली होती. त्यासाठी त्यांनी एक वेबलिंक उपलब्ध करून दिली होती होती.
या उपक्रमाचा एक डॅशबोर्डही ठेवण्यात आला होता. महाराष्ट्रातील सुमारे १६ हजार शाळांमधील १५ लाख विद्यार्थ्यांनी हा सिनेमा आपल्या शाळांमध्ये बसून पाहिला. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिका, इंडोनेशिया, सिंगापूर, युरोप, इंग्लंड, चीन, फिनलँड, कुवैत, जपान अशा अनेक देशांमधून सुद्धा हा चित्रपट पाहण्यासाठी लॉग इन झालेले होते. डॅशबोर्डवरील आकडेवारीनुसार, भारताव्यतिरिक्त इतर देशातील ६० हजार व्यक्तींनी हा चित्रपट पाहण्यासाठी लॉगईन केले होते. हा चित्रपट शाळांमध्ये दाखविण्यासाठी सकाळ आणि दुपारच्या सत्रात अशा दोन वेळा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र, प्रचंड प्रतिसाद आणि शाळांकडून होणारी मागणी लक्षात घेता संपूर्ण दिवसभरासाठी ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली.
शाळांकडून मोठ्या प्रमाणात मागणी झाल्याने आज सुद्धा सकाळी ११ आणि ११.३० वा. अशा दोन वेळांमध्ये या वेबलिंकवरून हा चित्रपट दाखविण्याची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.
अधिक वाचा : जात वैधता प्रमाणपत्र आता वर्षभरात सादर करता येणार