नागपुर: बांबूला उष्ण व दमट हवामान मानवते. उष्ण प्रदेशात बांबूची वाढ चांगली होते. त्यामुळे जगात अस्तित्वात असलेल्या बांबूच्या पंधराशे प्रजातींपैकी १२८ एकट्या भारतात आहेत. बांबू लागवडीमुळे रोजगाराचे प्रश्न सुटणार आहेत. तसेच नागपुरच्या तापमानात चार अंशानी घट होईल, असा विश्वास महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे सदस्य आनंद फिस्के यांनी व्यक्त केला.
विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे ‘बांबू लागवड आणि फायदे’ विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी फिस्के यांनी बांबू लागवडीच्या फायद्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. फिस्के म्हणाले,’भारतात बांबू लागवडीला सर्वाधिक उत्तम वातावरण आहे. चीनमध्ये बांबूच्या उपयोगातून जवळपास २६ विविध प्रकारची मूल्यवर्धीत उत्पादने तयार करण्यात येतात. भारत दरवर्षी वेगवेगळ्या उपयोगांसाठी तब्बल तीन लाख कोटी रुपयांचे लाकूड आयात करण्यात येते. याला बांबू हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कागद उद्योगाला बांबूचा सर्वाधिक उपयोग होऊ शकतो. बांबूपासून तयार केलेल्या इंधनावर विमानदेखील उडू शकते. एक एकर बांबूपासून सुमारे दहा हजार लिटर इंधन मिळू शकत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. बांबूमुळे भूजल पातळी वाढण्यात मदत होते. पर्जन्यमान वाढविण्यास बांबू, वड, कडुलिंब ही वृक्ष उपयोगी आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड व्हायला हवी.’ कार्यक्रमाला कौन्सिलचे अध्यक्ष शिवकुमार राव, सहसचिव दिनेश नायडू आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रदूषण कमी करण्यास उपयुक्त
आज जगातील प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये नागपूरचा समावेश आहे. एका संशोधनानुसार, कडुलिंबामुळे पंधरा वर्षांत जितके प्रदूषण कमी होते. तितक्याच प्रमाणात बांबूमुळे प्रदूषण कमी होण्यास केवळ तीन वर्षांचा काळ लागतो. बांबू लागवडीसाठी पाणी कमी लागते. आठवड्यातून केवळ दोन वेळा पाणी दिल्यास बांबूची चांगली वाढ होते. राज्याच्या महसूल वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या बांबू लागवडीसाठी सरकारनेही उत्तम धोरण तयार केले आहे. बांबू लागवडीसाठी विशेष योजनादेखील तयार करण्यात आली आहे, याचा लाभ विदर्भातील शेतकऱ्यांची घ्यायला हवा, असे आवाहन यावेळी फिस्के यांनी केले.
अधिक वाचा : नागपुरच्या लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने संत्र्याच्या तीन नव्या प्रजातींचे संशोधन केले