डोळ्यात तिखट फेकून खुनाचा प्रयत्न : युवकाची मृत्यूशी झुंज

मृत्यूशी झुंज

नागपूर : जुन्या वादातून तिघांनी एका युवकाच्या डोळ्यात तिखट फेकून तलवार आणि चाकूने हल्ला करीत खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री सदर परिसरात घडली.
अनिकेत मुकेश अंगलवार (२७) रा. खलासी लाईन असे जखमी युवकाचे नाव असून तो मेयो रुग्णालयात दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत हा रविवारी रात्री साडेनऊ वाजता खलासी लाईन चौरसिया चौकात मित्रासोबत उभा होता. दरम्यान, आरोपी उमेश ऊर्फ अम्मू मनोजकुमार पैसाडेली (२५) रा. कडबी चौक), मॉरीस आरीक स्वामी फ्रान्सिस आणि फरहान ऊर्फ गट्टू फिरोज बेग दोघेही रा. कॅथलिक क्लब, खलासी लाईन हे तेथे आले. त्यांनी जुन्या वादातून अनिकेतशी वाद घातला. त्यानंतर चिडलेल्या आरोपींनी पाठीमागे लपविलेली तलवार, चाकू आणि लोखंडी रॉड काढले आणि अनिकेतच्या डोळ्यात तिखट फेकले. त्यानंतर अनिकेतवर अचानक हल्ला केला करीत खून करण्याचा प्रयत्न केला. अनिकेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपींनी पळ काढला. गंभीर जखमी अनिकेतला मित्रांनी मेयो रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी आरोपींविरुद्ध खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केली नव्हती. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक गठित केले आहे.