एटीएम नाहीत सुरक्षित

नागपूर : डिजिटल युगामध्ये बँकेत जाऊन पैसे काढणे वा भरण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. त्यातल्या त्यात एटीएमची वाढलेली संख्या पाहता पैसे काढण्यासाठी करावी लागणारी पायपीटदेखील थांबली आहे. मात्र, चौकाचौकांत असलेले एटीएम सुरक्षित नसल्याचा मुद्दा एकदा माहितीच्या अधिकारांतर्गत केलेल्या अर्जातून पुढे आला आहे. २०१५ ते फेब्रुवारी २०१९ दरम्यान वेगवेगळ्या एटीएममधून पैसे लंपास होणे आणि इतर कारणांवरून एकूण ८३ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर १९ आरोपींना आतापर्यंत अटक झाली आहे.

‘ग्राहकांचा पैसा सर्व प्रकारे सुरक्षित ठेवण्यासाठी देशातील एटीएम सुरक्षित बनवा अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल’, अशा इशारा रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) देशभरातील बँका आणि एटीएम ऑपरेटर्सना दिला आहे. पण, त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. अद्यापही शहरातील सर्व एटीएम सुरक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर माहिती-तंत्रज्ञानांतर्गत दाखल झालेले गुन्हे, एटीएमसंबंधित गुन्हे यासंदर्भात आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी अर्ज केला. त्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार, एटीएमशी संबंधित ८३ पैकी १३ गुन्हे उघड झाले आहेत. यातील १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर ७० गुन्ह्यांचा छडा अद्याप लागलेला नाही. एकूण गुन्ह्यांच्या माध्यमातून ४४ लाख ४५ हजार ५० इतकी रक्कम चोरीला गेली आहे. याशिवाय, आयटी अॅक्टअंतर्गत बँकेशी संबंधित गुन्ह्यांचा विचार करता १४० गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी केवळ २६ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यातून ३५ आरोपींना अटक झाली असून ६ कोटी १४ लाख ४४ हजार ९२० इतकी रक्कम चोरीला गेली आहे. याशिवाय, अन्य कलमांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या ३७८ असून यातील १०७ उघडकीस आले आहेत. तर १२३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

काय म्हणते आरबीआय ? 

एटीएम सुरक्षित झाल्यानंतर पुढील जून २०१९ पर्यंत त्याचे पूरक ‘सीक्युरिटी वर्जन’ही कालबद्ध पद्धतीने लागू करण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक एटीएम घोटाळे समोर आले आहेत. त्यात विविध प्रकारे चोरांनी एटीएममधील रक्कम लांबवल्याचे उघड झाले आहे. मात्र, एटीएम प्रणाली अद्ययावत आणि अधिक सुरक्षित करण्याचे बँकांचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर, आरबीआयने बँकांना फैलावर घेतले आहे. याआधी मार्च २०१७ मध्ये आरबीआयने गोपनीय सर्क्युलर काढून ‘एटीएममध्ये सुरक्षा प्रणाली अधिक सुरक्षित करून त्याचा आढावा घ्यावा आणि उपाययोजना आखाव्यात’, असे आदेश दिले होते.

अशा असाव्यात सुविधा…

देशभरात फेब्रुवारी २०१८ पर्यंत २ कोटी ६ लाख एटीएम असल्याची नोंद आहे. त्यानुसार ‘बीआयओएस’ पासवर्ड, डिसएबलिंग यूएसबी पोर्ट, डिसएबलिंग ऑटोरन फॅसिलिटी, ऑपरेटिंग प्रणाली अद्ययावत, सुरक्षेचे उपाय, टाइम बेस अॅडमिन अॅक्सेस या बाबी असाव्यात. तसेच सर्व एटीएममध्ये अँटी-स्किमिंग आणि व्हाइटलिस्टिंग सोल्युशन असणे बंधनकारक आहे.

अधिक वाचा : लोकसभा निवडणूक २०१९ – LIVE: पुलावामामध्ये मतदान केंद्रावर ग्रेनेडचा स्फोट