नागपूर: वन संरक्षणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज लक्षात घेवून केंद्र सरकारनं नागपूरजवळच्या गोरेवाडा भागामध्ये आंतरराष्ट्रीय मानकानुसार प्राणीसंग्रहालय आणि जैव उद्यानाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. वने आणि वन्यजीवन यांच्या संरक्षण तसेच संवर्धनाविषयी भारताची प्रतिबद्धता कायम आहे, त्यादृष्टीनं सरकार सतत प्रयत्नशील आहे, असं केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं. गोरेवाडा इथं निर्माण करण्यात येणा-या प्राणी संग्रहालयामध्ये अनेक आकर्षणं असतील. यामध्ये जैव उद्यान, ‘इंडियन सफारी’, ‘अफ्रिकन सफारी’, ‘नाईट सफारी’, संशोधन, शिक्षण आणि प्रशिक्षण यांच्याबरोबरच पर्यटकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र सरकारने राज्याच्या वन्य विकास महामंडळ,नागपूर (एफडीसीएम)च्या माध्यमातून या आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. एफडीसीएम या प्राणी संग्रहालयासाठी विशेष उद्देश वाहने उपलब्ध करून देणार आहे. या प्रकल्पामध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारीतून (पीपीपी) गुंतवणूक करण्यात येणार आहे. तर सरकार 51 टक्के आर्थिक गुंतवणूक करणार आहे. त्याचबरोबर व्यवहार्यता फरकाचा निधी म्हणून सरकारनं 200 कोटी रूपये मंजूर केले आहेत.
गोरेवाडा भागामध्ये जंगल आणि वन्यजीवांचे संवर्धन करावे, प्राण्यांसाठी सुरक्षित अधिवास मिळावा, यासाठी या प्राणीसंग्रहालयाची निर्मिती करण्यात येत आहे. हे कार्य एफडीसीएमकडे सोपवण्यात आले आहे. या महामंडळाला राज्य वन खात्याकडून वित्त पुरवठा केला जातो तसेच मनुष्यबळही महामंडळाला देण्यात आले आहे.
इंडियन सफारी आणि त्यासाठी लागत असलेल्या पूरक गोष्टींची उभारणी करणे, आवश्यक जलसाठा निर्माण करण्याचे काम एफडीसीएम करणार आहे. यासाठी सरकार निधी देणार आहे, असंही प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितलं.