नागपूर : खरं आहे बहीण-भावाचे नाते हे एका धाग्याने किंवा रक्ताने नाही तर ते हृदयाने जोडलेले असते. बहिणीवर नितांत प्रेम करणाऱ्या भावाला जेव्हा कळले की, तिच्या पतीचे दीर्घाजाराने निधन झाले, तेव्हा तिच्या भविष्याच्या चिंतेने तो निराशेच्या गर्तेत गेला. आता बहिणीचे कसे होणार? या विचाराने सतत हसतखेळत राहणारा युधिष्ठीर अचानक मूक झाला. काय करावे नी काय नाही? याविचारातून युधिष्ठीरने अखेर स्वतःला संपविले. गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.
युधिष्ठीर सीताराम शाहू (२८) हा गिट्टीखदान हद्दीतील वायुसेना कॉलनीतील क्वॉर्टर क्रमांक ५४/६ मध्ये राहात होता. अविवाहित असल्याने तो एकटाच राहात होता. त्याचे आई-वडील मूळचे आसामचे. कामधंद्याच्या शोधात तो नागपुरात आला आणि इथलाच झाला. एकटाच होता तरी वायुसेना कॉलनी त्याच्यासाठी विश्व होते.
कामात कोणत्याही प्रकारची कुचराई न करणारा युधिष्ठीर स्वभावाने पण तितकाच हसमुख होता. कधीही त्याच्या चेहऱ्यावर दुःख दिसत नव्हते. सर्वांशी तो हसतखेळत राहायचा. पण, त्याच्या या स्वभावाला कोणाची नजर लागली की एकाएक तो कोणाशीच बोलेनासा झाला. पण, कामाप्रती त्याने निष्ठा सोडली नाही. कोणी विचारल्यास बहिणीच्या पतीचे निधन झाल्यामुळे टेन्शनमध्ये असल्याचे तो त्याच्या जवळच्यांशी बोलून दाखवित होता.
त्याला एक भाऊ आणि दोन बहिणी. दोन्ही बहिणींचे लग्न झाल्याने त्या आपापल्या घरी सुखी होत्या. मोठा भाऊ हैदराबाद येथे नोकरी करतो. काही महिन्यांपूर्वी मोठ्या बहिणीच्या पतीचे आजारामुळे निधन झाले. चिमुकल्यासह बहीण एकटी पडल्याचे त्याला अतीव दुःख झाले. बहिणीचे कसे होणार? या चिंतेने त्याला ग्रासले.
काही दिवसांपूर्वीच तो त्याच्या मोठ्या भावाशी एकट्या पडलेल्या बहिणीच्या भविष्याच्या विषयावर बोलला होता. पण, काय करावे? यावर त्याचे समाधान झाले नाही. बहिणीशी तो सतत मोबाइलवरून संपकांत राहत होता. पण, गेल्या दोन दिवसांपासून युधिष्ठीरचा फोन न आल्याने तीसुद्धा चिंतेत होती. रविवार, ७ मार्च रोजी तो नेहमीप्रमाणे उठला आणि त्याने परिसराची साफसफाई केली आणि क्वॉर्टरमध्ये परत आला. त्यादिवशी त्याने जेवणही केले नसल्याचे उघडकीस आले.
दिवसभर तो एकटाच क्वॉटरमध्ये होता. दुपारी ५.२० वाजताच्या सुमारास त्याने त्याच्या घरी सीलिंग फॅनला लुंगीच्या साहायाने गळफास लावून आत्महत्या केली. कोणीतरी त्याला आवाज देण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी रवींद्रकुमार लेठप्रल्हाद सिंग (३३) यांनी दिलेल्या सूचनेवरून गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.