नागपूर :रुग्णालयाचे बिल थकीत असल्याने एका वृद्धाला रुग्णालय प्रशासनाने बंधक बनवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित वृद्धाने पोलिसांशी संपर्क केल्यानंतरही कुठलीही मदत मिळाली नाही. त्यामुळे त्या वृद्धाने आत्महत्येचा इशारा दिला आहे.
गोळीबार चौक येथील ६२ वर्षीय सुरेश भरडभुंजे १० ऑगस्ट रोजी कोरोना संक्रमणामुळे बजाजनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका मोठ्या रुग्णालयात भरती झाले. भरडभुंजे यांना मनपाच्या नियमानुसार उपचाराचा खर्च घेतला जाईल, असे सांगितले होते. त्यांनी भरती होतानाच लाख रुपये जमा केले होते. रुग्णालयाचा खर्च अधिक असल्याने व प्रकृतीतही सुधारणा झाल्याने भरडभुंजे १० दिवसापासून सुटी मागत होते. त्यानंतरही डॉक्टरांनी दोन लाख रुपये जमा करण्यास सांगितले. भरडभुंजे यांनी रुग्णालयने केलेले उपचार व औषधासंबंधित माहिती घेतल्यावर रुग्णालयाने विनाकारण मनमानी वसुली केल्याचे लक्षात आले. त्यांनी पैसे जमा करण्यास नकार दिला. भरडभुंजे यांनी आपल्या संपर्काच्या माध्यमातून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे प्रकरणाची तक्रार केली. त्यांनी पोलिसांना फोन करून स्वत:च्या जीवाला हानी पोहचविण्याचा इशारा दिला. त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांना सुटी देण्यात आली असे सांगण्यात आले. तात्काळ ६५ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. सुटी मिळेल या अपेक्षेने भरडभुंजे यांनी रक्कमही जमा केली. १.६५ लाख रुपये जमा केल्यानंतरही त्यांना १.६० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. रुग्णालयाकडून होत असलेल्या मनमानीमुळे भरडभुंजे यांनी बजाजनगर पोलीस व नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. मंगळवारी सकाळी भरडभुंजे यांनी बजाजनगर ठाण्यात फोन केल्यानंतर तायडे नावाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालय सांगते हे ते ऐकून घ्या, असा सल्ला दिला. १.६० लाख न देता १ लाख रुपयात प्रकरण संपवून टाका असाही सल्ला दिला. सुटीसाठी दबाव बनवित असाल तर महामारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे भरडभुंजे दहशतीत आले. लोकमतशी बोलताना ते म्हणाले की मी बेरोजगार आहे. दहा दिवसांपासून सुटी मागत आहे. पण कुणीही ऐकून घेण्यास तयार नाही.
एका दिवसाचा चार्ज ४५ हजार
अशाच प्रकारे नंदनवन येथील एका खासगी रुग्णालयाने कोरोना संक्रमित एका परिवाराकडून प्रति व्यक्ती ४५ हजार रुपये एका दिवसाचे वसूल केले. एकाच रुममध्ये दोन लोकांना ठेवून ४५ हजार रुपये शुल्क आकारले. या कुटुंबातील सात ते आठ लोक संक्रमित होते. त्यांनी दोन ते पाच दिवस रुग्णालयात घालविले. हे रुग्णालय काही दिवसापासून चर्चेत आहे.