नागपुर : अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या वतीने आयोजित ९९ वे अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन यंदा नागपूरमध्ये २२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. मुंबईत झालेल्या नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. ३२ वर्षांनी नाटय़ संमेलन आयोजित करण्याचा मान विदर्भाला मिळाला आहे.
नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षांची घोषणा झाली, परंतु स्थळाबाबत निर्णय झाला नव्हता. यावर्षी नाटय़ संमेलनासाठी ९ प्रस्ताव आले होते. त्यापैकी सात स्थळांनी प्रस्ताव आधीच मागे घेतले. त्यामुळे लातूर आणि नागपूर अशी दोन स्थळे स्पर्धेत होती. गुरुवारी नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत नागपूरवर शिक्कामोर्तब करण्यात आले. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद नागपूर शाखा या संमेलनाचे आयोजन करणार आहे.
दरम्यान, नाटय़ संमेलन नागपूरला घेण्याचे निश्चित झाले असून शहरातील कलावंतांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कुठलेही वाद न होता सर्वाना विश्वासात घेऊन नाटय़ संमेलन यशस्वी करू, असा विश्वास नाटय़ परिषद नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल फरकसे आणि मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर यांनी व्यक्त केला. नागपुरात सुरेश भट सभागृह आणि रेशीमबाग मैदान या ठिकाणी नाटय़ संमेलन होणार आहे.
३३ वर्षांनंतर पुन्हा बहुमान
विदर्भात यापूर्वी १९१२ मो.वि. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली अमरावतीला, १९३९ मध्ये कारखानीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरला, १९६२ मध्ये शं.नी. चाफेकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरला, १९७५ मध्ये भालचंद्र पेंढारकर यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळला, १९८२ मध्ये पं. वसंतराव देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली अकोल्याला आणि १९८५ मध्ये प्रभाकर पणशीकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरला संमेलन झाले होते. आता १९८५ नंतर विदर्भात २२ ते २५ फेब्रुवारी २०१९ मध्ये ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली ३३ वर्षांनंतर नाटय़ संमेलन होत आहे.
अधिक वाचा : ‘शिवपुत्र संभाजी’ : प्रतिसादामुळे वाढविले दोन दिवसांचे प्रयोग