महाराष्ट्रातील राजकारणाला शनिवारी वेगळे वळण आले आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुंख्यमंत्री झाले. तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. राजभवनावर राज्यपालांनी दोघांना शपथ दिली. राज्यात स्थिर सरकारची गरज असल्यामुळे मी निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. तसंच, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीमधील सरकार स्थापनेबाबतची चर्चा संपत नव्हती. नको त्या मागण्या वाढत चालल्या होत्या. राज्याला स्थिर सरकार मिळावे यासाठी मी पुढे येत हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील जनतेला विश्वास देतो की त्यांनी जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला तडा न देता आम्ही दोघे चांगला कारभार करु, असे अजित पवार यांनी सांगितले. तसंच, दोघांनी एकत्र आल्याशिवाय सरकार होत नव्हते. त्यामुळे दोघांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणे उपयुक्त ठरते, असल्याचे त्यांनी सांगितले.
तसंच, स्थिर सरकारच्या दृष्टीकोणातून मी हा निर्णय घेतला आहे. कोणत्याच पक्षाला सरकार स्थापन करता आले नाही. राज्यात शेतकऱ्यांच्या समस्या, दुष्काळासारखा प्रश्न उभा असताना राज्याला स्थिर सरकारची अत्यंत गरज होती. सरकार स्थापनेच्या दृष्टीने कोणताही निर्णय होत नव्हता. त्यामुळे हे सरकार स्थापन झाले आणि मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.