राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 60 हजारांच्या पुढेच आढळत आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. असे असले तरी कोरोना संसर्ग कमी होण्याचं नाव घेत नाहीय. शिवाय अनेक ठिकाणी कोरोना नियमांचे काटेकोर पालन होत नसल्याचं दिसतंय. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील किराणा मालाचे दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरु ठेवण्यात येणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ होत आहे. रविवारी राज्यात जवळपास 68 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सदृश्य निर्बंध लादण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. पण, त्याचा योग्य तो परिणाम दिसून येत नसल्याचं दिसत आहे. शिवाय कठोर निर्बंध असतानाही लोक बाहेर फिरत आहेत. अनेक ठिकाणी गर्दी करत आहेत. सध्या किराणा मालाची दुकानं सकाळी 8 ते रात्री 7 पर्यंत सुरु ठेवण्यात येत होती. या दुकानांवर लोकांची मोठी गर्दी होत होती. यापार्श्वभूमीवर किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंतच म्हणजे 4 तासांच सुरु ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.