अभिनेता सोनू सूद पोहोचले मातोश्रीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

संजय राऊत यांनी सोनू सूदवर टीका केली होती

Sonu Sood Visited CM Thakre

मुंबई : अभिनेता सोनू सूद याने रविवारी रात्री उशिरा मातोश्री निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी त्याच्यासोबत मंत्री अस्लम शेख होते. दरम्यान, या भेटीनंतर साेनू याने माध्यमांशी बोलताना आमच्यात काहीही गैरसमज नसल्याचे सांगितले. त्यामुळे या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे.

सोनू याने लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्या अनेकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी मदत केली होती. सेना नेते संजय राऊत यांनी त्याच्यावर टीका केली होती. त्यानंतर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांत कलगीतुरा रंगला होता. सेनेकडून या भेटीवर काहीही प्रतिक्रिया आली नाही.

आदित्य ठाकरे म्हणाले – कोविड 19 मदतकार्याबाबत चर्चा झाली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सोनू सूद यांच्या भेटीची माहिती देताना आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोनू सूद यांना भेटून आनंद झाला. दोघांमध्येही कोविड 19च्या मदतकार्याबद्दल चर्चा झाली. गैरसमजांना स्थान नाही, परंतु त्यांच्याकडे जे आहे ते लोकांना मदत करण्याची वचनबद्धता आहे.’ आदित्य यांनी या भेटीची छायाचित्रे आपल्या ट्विटर हँडल अकाऊंटवर शेअर केली.

संजय राऊत यांनी केली होती सोनू सूदवर टीका

अभिनेता सोनू सूदने लॉकडाऊन सुरु झाल्यापासून परप्रांतीय कामगारांना बस, रेल्वे, विमानाने घरी पाठवले आहे. आतापर्यंत सोनूने कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, ओडीशा, देहारादून अशा विविध भागातील कामगारांना मदत केली. सोशल मीडियावर सोनूच्या कामगिरीचं कौतुकही होत गेलं. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या ‘सामना’मधील लेखातून सोनूच्या या बचावकार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.

सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असे संजय राऊत यांनी आपल्या लेखात म्हटले. “महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचे नाव घेतले जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरले, पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले. त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले,” अशी खोचक टीका त्यांनी आपल्या लेखातून केली.

सोनू सूद पडद्यावर आणि रस्त्यावर उत्तम अभिनय करतो. कारण पडद्यामागचे राजकीय दिग्दर्शक तितकेच कसलेले होते. सोनू सूद यांचा पुढील राजकीय चित्रपट कोणता ? त्याचा खुलासा लवकरच होईल, असे म्हणत राऊत यांनी सोनू सूदच्या माध्यमातून राजकारण करणाऱ्यांना खडे बोल सुनावले.

संजय राऊत यांनी या भेटीनंतरही केले ट्विट

सोनू सूद आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सोनूवर टीकास्त्र सोडत एक ट्विट केले. अखेर सोनू सूद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला. मातोश्रीवर पोहोचले, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले.