फुटपाथवर सामान ठेवणारे आणि नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई

कारवाई

नागपूर : शहरातील सी.ए.रोड, गोळीबार चौक, मस्कासाथ, इतवारी, मच्छीबाजार आदी भागांमध्ये मंगळवारी (ता.२८) मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आकस्मिक भेट दिली आणि नियमांचे उल्लंघन करणा-यांची चांगलीच धांदल उडाली. फुटपाथवर सामान ठेवणारे दुकान, दुकानातील गर्दी अशा सर्वांसह चितारओळीतील मूर्तीकारांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

एकीकडे शहरात वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. शहरातील अनेक गर्दीच्या ठिकाणी व्यावसायिकांचे अतिक्रमण यासाठी जबाबदार आहे. कोरोना संकटाच्या काळात रस्त्यावर गर्दी होणे ही अत्यंत धोकादायक बाब आहे. ही बाब लक्षात येताच मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गांधीबाग झोन अंतर्गत भागाचा आकस्मिक दौरा केला. या दौ-यामध्ये नियमांचे उल्लंघन करणारे आणि अतिक्रमण करणा-यांवर पाच ते १० दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

प्रारंभी आयुक्तांनी सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील फुटपाथवर सामान ठेवणा-या दुकानांचा चांगलाच समाचार घेतला व नियमांचे उल्लंघन करणा-या प्रत्येक दुकानदाराकडून १० हजारांचा दंड वसूल केला. त्यानंतर गोळीबार चौकातील जागन्नाथ बुधवारी भागात अनेक किराणा दुकानांमध्येही तिच स्थिती दिसून आली. त्यांच्यावरही १० हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. पुढे मस्कासाथ बंगाली पंजा, इतवारी भागात काही किराणा दुकानांनी फुटपाथवर अतिक्रमण करून सामान ठेवले होते तर काहींनी फुटपाथवरच दुकान मांडले होते. अशा दुकानदारांनाही यापुढे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन केल्यास सामान जप्त करण्याचा इशारा देत त्यांच्याकडून पाच व १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

फुटपाथवरील लाखो रुपयांचे साहित्य जप्त

मच्छीबाजार जुने मोटार स्टँड भागात हार्डवेअर विक्रेत्यांनी संपूर्ण साहित्य फुटपाथवर ठेवले होते. सदर प्रकाराची गांभीर्याने दखल घेत मनपा आयुक्तांनी अतिक्रमण विभागाच्या पथकाला बोलवून संपूर्ण साहित्य जप्त केले. या भागातील दोन हार्डवेअर दुकानांचे बरेच सामान फुटपाथवर ठेवले होते. या सामानांची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. पाईप, लोखंडी साहित्य, ट्रक व बुलडोजरचे टायर, लोखंडी पत्रे आदी साहित्यांवर जप्तीची कारवाई करून अतिक्रमण विरोधी पथकाच्या ट्रकमध्ये टाकण्यात आले. याच भागात चप्पल आणि बुट विक्री करणा-याने थेट फुटपाथवरच दुकान मांडले होते. सुरूवातीला दंड भरण्यास टाळाटाळ करणा-या या दुकान मालकाने साहित्य जप्त होताना पाहून दंड भरला. दंड भरल्याने जप्तीची कारवाई टळली असली तरी यापुढे फुटपाथवर दुकान न लावण्याची सक्त ताकीदही आयुक्तांनी दिली.

पुढे चितारओळीत मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्त्या रस्त्यावर ठेवल्याचे दिसून आले. या ठिकाणी आयुक्तांनी मूर्तीकारांना नियमांचे उल्लंघन न करण्याचे आवाहन केले. रस्त्यावर मूर्ती ठेवल्याने अतिक्रमणाच्या कारवाई अंतर्गत सर्व मूर्तीकारांकडूनही दंड वसूल करण्यात आला.

-तर २५ हजार रुपये दंड

शहरात नियमांचे उल्लंघन करणारे आणि अतिक्रमण करणा-यांवर कारवाई करीत सद्या पाच व १० हजार रुपये दंड वसूल करण्यात येतो. शहरातील नागरिकांसह दुकाने, आस्थापनांना शिस्त लागावी. नियमांचे पालन व्हावे व रस्ते, फुटपाथ मोकळे राहावेत या उद्देशाने ही कारवाई केली जाते. मात्र दंड भरूनही काही नागरिक नियमांचे उल्लंघन करणे सोडत नाही. यापुढे नागरिकांकडून नियमांचे पालन न झाल्यास पुढे २५ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल, असा इशाराही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी दिला.