नागपूर: उमरेड मार्गावरील चांपानजीकच्या उटी नर्सरीजवळ पीक अप वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली. योगिता सुमित वाढवे (२५), राजिता जगदीश कुमरे (२५), दोघीही रा. चांपा (उमरेड) व प्रमोद श्रीराम उईके (४०), रा. तारणा (उमरेड) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत एक महिला गंभीर असून तिच्यावर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतक प्रमोद हे रजिता व योगिता यांना घेऊन कावीळच्या उपचारासाठी वेलतूर येथे जात होते. सकाळी ७ वाजताच्या सुमारास उटी शिवारातील भिवापूर नर्सरीजवळ चांपाकडून गिरडकडे जाणाऱ्या पीक अप वाहनाची समोरासमोर धडक झाली. दुचाकी चक्काचूर झाली तर पीक अप वाहन उलटले. यामध्ये योगिता आणि प्रमोद यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर रजिता कुमरे हिचा नागपूर येथे शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याविषयीची माहिती मिळताच कुही पोलिसांच्या पाचगाव चौकीचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के, संजय कानडे, विजय कुमरे, दिलीप लांजेवार, अमित पवार, पवन सावरकर घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमींना उपचारासाठी नागपूर येथे पाठविले. या प्रकरणी सुमित वाढवे यांच्या तक्रारीवरून कुही पोलिसांनी पीक अप वाहनाच्या चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पाचगाव चौकीचे कमलेश सोनटक्के करीत आहेत.