१ ऑगस्टपासून नागपूर विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र होणार सुरू

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२०-२१ या वर्षासाठीचे शैक्षणिक कॅलेंडर घोषित केले आहे. या कॅलेंडरनुसार वार्षिक व सत्र प्रणालीच्या अभ्यासक्रमांचे पहिले सत्र १५ जूनऐवजी आता १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University

नागपूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत अद्यापही ठोस निर्णय झालेला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. दरम्यान यास्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२०-२१ या वर्षासाठीचे शैक्षणिक कॅलेंडर घोषित केले आहे. या कॅलेंडरनुसार वार्षिक व सत्र प्रणालीच्या अभ्यासक्रमांचे पहिले सत्र १५ जूनऐवजी आता १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर हिवाळी परीक्षा २० नोव्हेंबरपासून घेण्याचा विद्यापीठाचा मानस असून, २०२१ च्या उन्हाळी परीक्षा या २२ मार्चपासून सुरू होतील.

विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे शैक्षणिक कॅलेंडर घोषित केले आहे. दरवर्षी शैक्षणिक सत्राची सुरुवात १५ जूनपासून होते. यंदा मात्र १ ऑगस्टपासून शैक्षणिक सत्राची सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दीड महिन्याच्या कालावधीची भरपाई विद्यापीठाच्या दिवाळी, हिवाळी व उन्हाळी सुट्या कमी करून करण्यात येणार आहे. यावर्षी दिवाळीच्या सुट्या एक महिन्याऐवजी एकाच आठवड्याच्या असतील. तर हिवाळी सुट्या २० दिवसांच्या व उन्हाळी सुट्या एका महिन्याच्या असतील. विषम सत्राच्या नियमित परीक्षा या १२ डिसेंबर रोजी सुरू होतील. उन्हाळ्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा २२ मार्च रोजी तर नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा २२ मेपासून सुरू होतील, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान

सत्र प्रणालीनुसार महाविद्यालयांना डिसेंबर महिन्यापर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. युजीसीच्या नियमानुसार सेमिस्टर सत्रात किमान ९० दिवसांचे शैक्षणिक सत्र व्हायला हवे. मात्र ‘कोरोना’मुळे महाविद्यालये उशिरा सुरू झाली किंवा विद्यार्थी उशिरा आले तर सत्र कसे पूर्ण होणार, हादेखील एक प्रश्नच आहे. ग्रामीण भागात ‘ऑनलाईन’ वर्ग घेण्यास अडचणी येऊ शकतात.

Also Read- Mukesh Ambani Hits Zero Net-Debt Goal In “Amazing Lockdown Achievement”