नागपूर : पंढरपूर – आषाढी एकादशीच्या महासोहळ्यासाठी पंढरीत जवळपास बारा लाख भाविक दाखल झाले आहेत. श्री विठ्ठल रूक्मिणीची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे गेली आहे. गुरुवारी दशमीदिवशी पंढरी वारकऱ्यांनी फुलून गेली आहे. सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू आहे. संतांच्या पालख्या वाखरीतून सायंकाळी येथे दाखल झाल्यानंतर शहरात गर्दी आणखी वाढली आहे. सर्व मठ, हॉटेल, धर्मशाळा, हॉल आणि मंदिर परिसरातील घरेही हाऊसफुल्ल झाली आहेत. मोकळ्या जागांवर सर्वत्र वारकऱ्यांच्या राहुट्या आणि तंबू दिसून येत आहेत.
गुरुवारी वाखरी संतभेटीचा कार्यक्रम झाल्यानंतर संतांच्या सर्व पालख्यांनी पंढरीकडे प्रस्थान ठेवले. सायंकाळी पालख्या पंढरीत दाखल झाल्यानंतर पालख्यांच्या स्वागतासाठी इसबावी येथे पंढरपूरकरांनी मोठी गर्दी केली होती. पालख्या व दिंड्यांसमवेत पायी चालत आलेले आणि बस व रेल्वेच्या माध्यमातून लाखो वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. शुक्रवारी पहाटे दोन वाजता मुख्यमंत्री फडणवीस हे सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करणार असून, त्यांच्यासमवेत राज्य मंत्रिमंडळातील अनेक सहकारी उपस्थित राहणार आहेत. यंदा महापूजेचा वेळ कमी करण्यात आल्याने एकादशी दिवशी जास्त भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे. मुख्यमंत्र्यांचे गुरुवारी सायंकाळी पंढरीत आगमन झाले असून, त्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एकादशीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, सर्वत्र मोठा बंदोबस्त तैनात आहे. ‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातूनही नजर ठेवण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील व अतिरिक्त अधीक्षक अतुल झेंडे हे येथे तळ ठोकून आहेत.
भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समितीतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शन रांगेत शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात आहे. दशमी, एकादशी व द्वादशी या तीन दिवशी रांगेत चहा, उपवासाचे पदार्थ व अल्पोपहार दिला जात आहे. रांगेत अन्नछत्रही उघडण्यात आले आहे. अन्य संस्थांही यासाठी सहकार्य करीत आहेत.
चंद्रभागा वाळवंटात भाविकांची मोठी गर्दी असून स्नानासाठी झुंबड उडत आहे. येथे भक्त पुंडलिकांच्या दर्शनासाठी ही रांगा लागत आहेत. नदीच्या पैलतिरावर साकारण्यात आलेल्या भक्तिसागर ६५ एकरातील सर्व प्लॉट आता दिंड्यांना देण्यात आले आहेत. येथे किमान दीड लाख भाविक उतरले असावेत असा अंदाज आहे. तीन रस्त्यापर्यंत या भागात व्यापार्यांनी दुकाने थाटली आहेत. शहरात ही मोठ्या प्रमाणात परगावचे व्यापारी व्यवसायासाठी आले आहेत. जागा मिळेल तेथे त्यांनी आपली दुकानं थाटली आहेत.
संतांच्या पालख्या विठुरायाच्या नगरीत दाखल
महाराष्ट्रासह इतर राज्यातून लाखो वैष्णवांना घेवून आषाढी वारीस माहेरच्या ओढीने पंढरीस निघालेल्या संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत निवृत्तिनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत एकनाथ यांच्यासह सुमारे १०० संतांच्या पालख्या सायंकाळी विसावा पादुका येथील शेवटचा विसावा घेवून रात्री उशिरा पंढरीत दाखल झाल्या. पंढरपूर नगरवासियांच्यावतीने संतांसह आलेल्या वैष्णवांचे मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. संतांच्या पालख्या आज दुपारी भोजनानंतर वाखरीचा निरोप घेवून शेवटच्या पंढरपूर मुक्कामासाठी मार्गस्थ झाल्या. वाखरी तळावर संतांच्या दर्शनासाठी लाखो वैष्णवांनी गर्दी केली होती. प्रत्येकाला विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली होती. दुपारी १ वाजता श्री संत नामदेव महाराज हे पांडुरंंगाचे निमंत्रण घेवून वाखरीत दाखल झाले. त्यानंतर या मानाच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. वाखरी ते पंढरपूर हा भक्तीमार्ग टाळ, मृदुंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात दुमदुमून गेला होता. पंढरपूर हाकेच्या अंतरावर राहिल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता.
श्री संत सोपानकाकांचा पालखी सोहळा दुपारी दीड वाजता पंढरीकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी साडे तीन वाजता हा सोहळा विसावा पादुका मंदिराजवळ पोहोचला. त्यानंतर सायंकाळी ३.४५ वाजता निवृत्तीनाथ, सायंकाळी ४ वाजता एकनाथ महाराज, सायंकाळी ४.३० वाजता तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पोहोचला. यावेळी पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात पार पडले. सर्वात शेवटी दुपारी अडीच वाजता वाखरीहून निघालेला श्री संत ज्ञानराजांचा पालखी सोहळा वाखरीचा ओढा पार करून पुरंदरे मळ्याजवळ पोहोचला. येथे माउलींची पालखी मुख्य रथातून उतरवून ती भाटेच्या रथात ठेवण्यात आली. हा रथ ओढण्याचा मान परंपरेप्रमाणे वडार समाजाला असल्याने या समाजातील बांधवांनी हा रथ ओढत इसबावी येथील पादुका मंदिरापर्यंत आणला. सायंकाळी ५.१५ वाजता हा सोहळा इसबावी येथे पोहोचला. यावेळी हजारो भाविकांनी खारीक, बुक्याची मुक्तपणे उधळण करीत माउलींचे दर्शन घेतले. शेकडो किलोमीटर चालून न थकता, न दमता पंढरीच्या सावळ्या विठूरायाला पाहण्यासाठी आसुसलेल्या वारकर्यांच्या चेहर्यावरचा आनंद पंढरी समीप आल्याने ओसंडून वाहत होता.
इसबावी येथे पंढरपूर नगरपालिकेच्यावतीने सर्व संतांच्या पालखी सोहळ्यांचे मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण माउली.. माउली नामाच्या जयघोषात पार पडले. हे रिंगण पाहण्यासाठी लाखो भाविकांनी रस्त्याच्या दुतर्ङ्गा गर्दी केली होती. आरतीनंतर श्री ज्ञानराजांच्या पादुका श्रीमंत ऊर्जीतसिंह शितोळे सरकार यांच्या हातात देण्यात आल्या. उजव्या हाताला वासकर तर डाव्या हाताला सोहळ्याचे मालक आरङ्गळकर यांना घेवून शितोळे सरकार श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीकडे मार्गस्थ झाले.
..तर कृत्रिम पाऊस !
‘राज्यातील अनेक भागात सध्या पावसाने ओढ दिल्याने हवामान खात्याच्या सुचनेनंतर लगेच कृत्रिम पावसाचे प्रयोग केले जातील,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात सांगितले. गुरूवारी रात्री विश्रामगृहावर सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना शिवमुद्रा देवून गौरविण्यात आले. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण त्यांच्या एकीमुळे मिळाले असून, आपण फक्त कर्तव्य पार पाडल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. मराठा धनगर समाजासह इतर समाजाचे राहिलेले प्रश्नही सोडविले जातील, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. पुढच्या वर्षीही मीच पुजेला येणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अधिक वाचा : नागपूर : आंध्रा बँकेच्या व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा