अमरावती, दि. 1 : जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळता आधार नोंदणी केंद्रे व आपले सरकार सेवा केंद्रे सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केले आहेत.
प्रतिबंधित क्षेत्रातील गावे किंवा परिसरात आधार केंद्र सुरु करता येणार नाहीत. इतर ठिकाणी आधार नोंदणी केंद्रे सुरु करताना सामग्री, उपकरण व परिसराचे निर्जंतुकीकरण करून घेणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंध दक्षता नियमांचे केंद्रचालक व इतर ऑपरेटर यांनी पालन करावे. काम करणा-यांनी व अभ्यागतांनी मास्क वापरावा. केवळ फोटो काढताना मास्क काढता येईल, मात्र, सुरक्षित अंतर राखले जाण्याची काळजी घ्यावी. प्रत्येक नोंदणी अद्ययावत झाल्यावर ऑपरेटर बायोमेट्रिक उपकरणे स्वच्छ करेल. गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना येण्याची वेळ निश्चित करून द्यावी. केंद्रात आधार शिबिर घेऊ नये. कुठलाही नागरिक किंवा केंद्राचा कर्मचारी यांच्यात खोकला, कफ, ताप, श्वसनक्रियेत अडथळा आदी लक्षणे आढळल्यास आधार केंद्रात न येण्याबाबत फलक लावावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
‘युआयडीएआय’ने पुरविलेल्या टेम्प्लेटनुसार पत्रक आधार नोंदणी केंद्राच्या दर्शनी भागात लावण्याचे निर्देश आहेत. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील अमरावती महानगरपालिका व तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणचे आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे. हँडवॉश, सॅनिटायझर, सामाजिक अंतर राखणे, गर्दी टाळणे आदी दक्षता पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Also Read- रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांसाठी प्रमाणित कार्यप्रणाली निश्चित