वासन वाइन शॉपच्या मालकाविरुद्ध गुन्हा

नागपूर: गुन्हेशाखेच्या युनिट चारने छापा टाकून दारु तस्कराला अटक केली. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात दारुसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणात पोलिसांनी मेयो हॉस्पिटल चौकातील वासन वाइन शॉपच्या मालकाविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. रमेश मारोतराव भुते (वय ४२, रा. नेताजीनगर, गायत्री कॉलनी) हे अटकेतील तस्कराचे तर अशोक लखाराम वझानी हे वाइन शॉप मालकाचे नाव आहे.

गुन्हेशाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम, सहाय्यक निरीक्षक दिलीप चंदन, उपनिरीक्षक पुरुषोत्तम मोहेकर, देवेंद्र चव्हाण, सुधाकर धंदर व त्यांचे सहकारी गस्त घालत होते. रमेशने एम.एच. ४०-ए ९०९९ क्रमांकाच्या जीपमध्ये दारुचा साठा लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी जीपमधून ६२४ विदेशी दारुच्या बाटल्या व जीप जप्त केली. रमेश याला अटक केली. कोणताही परवाना नसताना मोठ्या प्रमाणात दारू दिल्याने वासन वाइन शॉपच्या मालकाविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यापूर्वी बजाजनगर पोलिसांनी रजत वाइन शॉपच्या मालकाविरुद्धही अशाचप्रमाणे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.