कामठी रोडवर लावण्यात येणाऱ्या २७ फूट लांब एका कॉन्क्रिटचा सेगमेंट तुटला

महामेट्रो

नागपूर : महामेट्रोतर्फे कामठी रोडवर बनविण्यात येणाऱ्या डबलडेकर पुलावर टेका नाका, माता मंदिराजवळ लावण्यात येणाऱ्या २७ फूट लांब एका कॉन्क्रिटचा सेगमेंट तुटला. ही घटना मंगळवारी सकाळी ५.३० वाजता घडली. व्यस्त मार्गावर पुलाचा एक भाग तुटल्याच्या मोठ्या आवाजाने परिसरातील अनेकांची झोप उडाली. घटनेनंतर सेगमेंट पिलरांवर लागलेल्या स्टील गर्डरने जुळलेल्या लोखंडाच्या जाड तारांमुळे लटकल्याने रस्त्यावर पडला नाही. त्यामुळे जीवितहानी टळली.

घटनेनंतर रस्त्याचा एक भाग काही तासांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर दोन्ही पिलरांच्या भागात बॅरिकेडिंग करण्यात आले. या कारणामुळे या अरुंद भागातून अवजड ट्रकला जावे लागले. डबलडेकर पुलाचे बांधकाम कंत्राटदार कंपनी अ‍ॅफकॉन्स करीत आहे. २८ महिन्यात पूर्ण होणाऱ्या या पुलासाठी ३५ महिने लोटले आहेत. त्यानंतरही ५० टक्केच काम झाले आहे. अ‍ॅफकॉन वेळेत काम पूर्ण करू शकले नाही. लॉकडाऊन उघडल्यानंतरही कामाने वेग घेतलेला नाही. सेगमेंट एवढा कमजोर कसा बनला, या संदर्भात अ‍ॅफकॉन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला असता उत्तर मिळू शकले नाही.

बांधकामाच्या मजबुतीची खरंच होत आहे तपासणी?

अ‍ॅफकॉन्स तीन ठिकाणी सेगमेंट तयार करीत आहे. शहरातील आतापर्यंतच्या सर्वात लांब डबलडेकर पुलावरून हजारो वाहने दररोज जातील. त्यामुळे पुलाची मजबुती दमदार असणे आवश्यक आहे. पण या घटनेवरून मजबुतीचा प्रत्यय आला आहे. साईटवर पिलरांवर सेगमेंट ठेवण्यापूर्वी याची मजबुतीची तपासणी व्हावी. काम करणारी आणि करून घेणाऱ्या एजन्सीचे अधिकारी कोरोनाच्या भीतीने साईटवर येत नाहीत. याच कारणामुळे मजबुतीकडे दुर्लक्ष होत आहे.

होत आहेत टेस्टिंग

घटनेसंदर्भात महामेट्रोचे उपमहाव्यवस्थापक (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) अखिलेश हळवे म्हणाले, या ठिकाणी सेगमेंटची टेस्टिंग सुरू होती. त्याची अल्ट्रासोनिक किरणांनी तपासणी करण्यात येत होती. दोन पिलरांमध्ये जास्त वजनाच्या सेगमेंटला स्थापन करण्याच्या प्रक्रियेत अल्ट्रॉसोनिक किरणांच्या तपासणीत तो कसा तुटला, हा प्रश्न आहे. तो अत्यंत मजबूत स्टीलच्या तारांवर लटकत होता. सेंगमेंट हिंगणा, वर्धा रोड व भंडारा रोडवर कापसी येथील प्रकल्पात बनविण्यात येत आहेत.

सळाखी बाहेर निघाल्या

टेका नाका चौकाजवळील काही दुकानदारांनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले, सेगमेंट तुटण्याचा मोठा आवाज आला होता. लोकमत चमूने घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा तुटलेल्या भागाला हिरव्या रंगाची जाळी लावली होती. तुटलेल्या भागाच्या सळाखी बाहेर आल्या होत्या. सूचना मिळताच मेट्रोची तांत्रिक चमू घटनास्थळी पोहोचली. या चमूत कोण होते, ही बाब महामेट्रोने स्पष्ट केली नाही.