मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या युवा माहिती दूत या उपक्रमाचा आरंभ स्वातंत्र्य दिनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला. युनिसेफच्या सहकार्याने आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रत्यक्ष सहभागाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या विविध ठिकाणी झालेल्या उद्घाटन सोहळ्याला महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, वरिष्ठ अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.
शेतकरी, महिला, आदिवासी, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ज्येष्ठ नागरिक अशा विविध समाज घटकांसाठी शासन राबवित असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्य म्हणून संबंधित कुटुंबांना द्यावी अशी ही योजना आहे. माता-बाल संगोपन, आरोग्य, लसीकरण, शिक्षण, स्वच्छता यासंदर्भातही युवकांनी जनजागृती करावी अशी अपेक्षा आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही ऐच्छिक योजना आहे. या करिता ‘युवा माहिती दूत’ या प्ले स्टोअरवरील अॅप्लिकेशनमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी नोंदणी करावयाची आहे. युवा माहिती दूत झालेल्या युवकाने सहा महिन्यात 50 घरी जाऊन त्या कुटुंबाला लागू पडतील अशा योजनांची माहिती द्यावयाची आहे आणि त्याचा लाभ घेण्याकरिता कोणाशी संपर्क करावा, याबद्दल माहिती द्यावयाची आहे. राज्यातील सुमारे 1 लाख विद्यार्थी यात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. या विद्यार्थ्यांना शासनाचे माहिती दूत म्हणून ओळखपत्र मिळेल आणि प्रमाणपत्र मिळेल.
कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे एका विशेष समारंभात या योजनेच्या संकल्पनेचे स्वागत केले. तरूणांनी सामाजिक बांधिलकी म्हणून शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
समाजाचे परिवर्तन करण्याची ताकद युवा वर्गामध्ये आहे.महाविद्यालयांनी शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थ्यांना देण्यासाठी आठवड्यातून एक तास ठेवावा, असे आवाहन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत औरंगाबादेत या उपक्रमाचा शुभारंभ केला.शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार हा मुख्यत्वे वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि रेडिओ तसेच पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून केला जातो. मात्र आता माहिती दूत या उपक्रमामुळे जनतेशी थेट संवाद साधता येणार आहे, असे प्रशंसोद्गार वर्धा यथे गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी काढले. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी नांदेड येथे या योजनेचा आरंभ केला.
पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा म्हणाले, आजमितीला शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार हा मुख्यत्वे वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि रेडिओ यांच्यामार्फत केला जातो. सोशल मीडियाचा होणारा उपयोग मर्यादित स्वरुपाचा आहे. प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचणाऱ्या शासकीय योजना दुहेरी संवादातून त्यांच्यापर्यत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी राज्यातील समाजकार्याची आवड असलेल्या उत्साही तरूण वर्गाचे साहाय्य घेण्याच्या या उपक्रमामुळे आदिवासी समाजाला त्यांच्यासाठीच्या योजनांची थेट माहिती मिळेल.
या उपक्रमाची माहिती देताना नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाअंतर्गत किमान एक लाख युवक राज्य शासनाच्या किमान 50 योजनांच्या माहितीशी जोडले जातील. या युवकांमार्फत किमान 50 लाख लाभार्थ्यांशी म्हणजेच किमान अडीच कोटी व्यक्तिंशी शासन जोडले जाईल. युवकांच्या समाजमाध्यमातील प्रभावी वापराचा शासकीय योजनांचा प्रसारासाठीही याचा लाभ होईल.
ठाणे येथेही काही पदवीधर विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मोबाईलवर नोंदणी करुन युवा माहिती दूत उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या माध्यमाद्वारे शासनाच्या कल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचतील असे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. शासन राबवित असलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी या कुटुंबाना युवकांनी दिलेल्या माहितीचा उपयोग होईल, असे जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
युवा माहिती दूत हे शासकीय योजनांचे लाभार्थी व शासन यामधील दुवा ठरतील, असा विश्वास भंडारा येथे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला.
अलिबाग येथे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी युवा माहिती दूत या उपक्रमाचे स्वागत करुन लोगोचे अनावरण तसेच पुस्तिकेचे विमोचन केले. यावेळी त्यांनी विविध शासकीय योजना पोहोचविण्यासाठी युवा माहिती दुतांनी सज्ज व्हावे, असे सांगितले.
परभणीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, युवकांची शक्ती ही सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरु शकते. युवकांनी समाजसेवेचे व्रत स्वीकारुन शासनाच्या योजना सर्वसामान्य गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
शासकीय योजनांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम युवा माहिती दूत करणार असल्याने शासन करीत असलेल्या विविध विकासकामांची माहिती नागरिकांना कळू शकणार आहे. त्याचबरोबर अनेक योजनांचा लाभही त्यांना घेता येईल, असे सोलापूरचे पालकमंत्री विजयदेशमुख यांनी सांगितले. तर, युवा माहिती दुतामुळे शासनाना जनतेतील संवाद अधिक गतीने वाढेल, असा विश्वास धुळ्यात ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.