अपुरा कोळसा, पाण्याचा तुटवडा आणि वीज प्रकल्पातील बिघाडामुळे २०१७-१८ या आर्थिक वर्षात महानिर्मिती ची वीजनिर्मिती ३० टक्क्यांनी घटली आहे. या सुमार कारभारामुळे त्यांच्या प्रतियुनिट विजेचा दर सुमारे ३० पैशांनी वाढणार आहे. त्याचा फटका राज्यातील सर्वच ग्राहकांना बसणार आहे.
राज्य सरकारची मालकी असलेल्या महानिर्मिती या वीज कंपनीची एकूण वीजनिर्मिती क्षमता साडेतेरा हजार मेगावॅट एवढी आहे. २०१७-१८ या वर्षात त्यांनी ६८ हजार ५३० दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र कोळशाच्या अपुऱ्या पुरवठय़ाबरोबरच इतर कारणांमुळे तब्बल ३० टक्के म्हणजे सुमारे २० हजार दशलक्ष युनिट कमी विजेची निर्मिती झाल्याचे महानिर्मितीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे दिलेल्या दरवाढीच्या प्रस्तावात स्पष्ट केले आहे.
महानिर्मितीच्या अनेक वीज प्रकल्पांमधून तयार होणाऱ्या विजेचे दर जादा असल्याने त्याचा भार ग्राहकांवर पडत असतानाच आता पुरेशी वीजनिर्मिती होऊ न शकल्याने ग्राहकांवर वीज दरवाढीच्या माध्यमातून जादा भार पडणार आहे.प्रकल्प उभारणीचा खर्च जादा एनटीपीसीसह इतर खासगी कंपन्यांचा औष्णिक वीज प्रकल्प उभारण्याचा प्रतिमेगावॅट चार-साडेचार कोटी रुपये एवढा खर्च येतो. मात्र महानिर्मितीला वीज प्रकल्प उभारण्यास वेगवेगळ्या कारणाने विलंब लागतो.त्यामुळे त्याच्या प्रकल्प उभारणीचा खर्च प्रतिमेगावॅट ६ कोटी रुपये येत असल्याचे वीजतज्ञडॉ. अशोक पेंडसे यांनी सांगितले. या जादा खर्चाचा परिणाम वीजनिर्मितीवर होतो.
अधिक वाचा : Maharashtra has longest Metro rail network under construction