देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी येथे येऊन प.पू. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलशाला अभिवादन केले. ‘तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला वंदन करताना व या पवित्र स्थळी मला सर्वांप्रती शांती, स्नेह आणि प्रेमाची भावना निर्माण झाली. येथे येऊन मी धन्य झालो,’ अशी प्रतिक्रिया रावत यांनी दीक्षाभूमीवरील व्हिजिट बुकवर नोंद केली. मंगळवारला त्यांनी पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी त्यांचे दीक्षाभूमी स्तुपाची प्रतिमा व भारतीय संविधान भेट देऊन सत्कार केला.
मुख्य निवडणूक आयुक्त रावत म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे भारतीय संविधान निर्मितीत महत्त्वाचे योगदान आहे. यामुळेच आज भारतवासी प्रगतीपथावर असून लाभान्वित आहेत. भारतीय संविधानातील लोकशाहीवर माझा दृढ विश्वास झाला आहे, असे मतही त्यांनी नोंदविले. यावेळी निवडणूक आयोगाचे महासंचालक धीरेंद्र ओझा, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विन कुमार, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुगदल, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य एन. आर. सुटे, शिरीष मोहोड, प्रियदर्शनी बोरकर, आभा बोरकर, प्राचार्य डॉ. पी. सी. पवार, डॉ. अरुण जोसेफ, विजय गजभिये, शरद मेश्राम, देवा रंगारी, आशिष द्विवेदी उपस्थित होते.
अधिक वाचा : रमण विज्ञान केंद्र येथे पाण्याविषयी माहीत करून घ्या खूप काही…