नागपूर :- उपराजधानित सुरु असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. वास्तविक पाहता आम्हाला असे वाटले होते की, सरकारने ज्याप्रमाणे अट्टाहास करत पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतले. सरकारच्या या निर्णयामुळे विदर्भ आणि मराठवाड्याचे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा विरोधकांना होती. मात्र या सरकारने या अधिवेशनात विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या प्रश्नाला गांभीर्याने न घेता केवळ घोषणाबाजी आणि आश्वासन दिले. या सरकारने वैदर्भीय आणि मराठवाड्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसली असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला आहे.
आज पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. त्यानंतर अधिवेशनाच्या कामकाज याबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, हे अधिवेशन नागपूर मध्ये घेण्यामागे सरकारचा कुठला हेतू होता हे शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला कळले नाही. या सरकारने अधिवेशनात केवळ घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पडला. आज विरोधकांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून विविध मुद्द्यावर सरकारला जाब विचारला. परंतु हे सरकार आमच्या प्रश्नांना योग्य उत्तर देऊ शकले नाही. त्यांनी कुठल्याही मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही मग ते मराठा आरक्षणाचे मुद्दे असो धनगर समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे असो किंवा शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाबत मुद्दे असो या सरकारने केवळ उडवाउडवीची उत्तरे देऊन या अधिवेशनातून पळ काढण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या राज्यातील जनतेला हे कळून चुकलेले आहे की हे सरकार केवळ फेकू सरकार आहे. यां सरकारला जनतेच्या प्रश्नांसोबत काहीही घेणेदेणे नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये या सरकारला महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.